अहिल्यानगर (दि.20 प्रतिनिधी):- संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडील रहाणे मळा येथे एकाने बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारा कागद तस्करीच्या स्वरूपाने भारतात आलेला असताना तो कागद कुरिअरच्या माध्यमातून संगमनेर येथे मागवून प्रिंटरच्या सहाय्याने भारतीय चलनातील बनावट नोटा बनविण्याचा प्रयत्न केला.परंतु एका घरात तयार करणाऱ्या इसमावर छापा घालून त्याला पकडण्यात आले आहे.
डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स पुणे च्या पथकाने ही कारवाई आज सकाळी केली आहे.रजनीकांत राजेंद्र रहाणे (रा. राहणे मळा, गुंजाळवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे.सदर घराच्या पहिल्या मजल्यावर असणाऱ्या खोलीमध्ये एका प्लास्टिक पिशवीमध्ये ए फोर साईचे शंभर पेपर मिळून आले त्या पेपरची पाहणी केली असता हाय सिक्युरिटी ग्रेड असलेली रंगीत पट्टी त्या ठिकाणी दिसून आली. त्यावरून सदर पेपर हा भारतीय चलनातील खोट्या नोटा बनवण्यासाठी वापरत असल्याची खात्री झाली. तसेच त्याच ठिकाणी एका प्लास्टिकच्या कचऱ्याच्या डब्यात काही ए फोर साईजचे फाडलेले पेपर आढळून आले.
सदरची पेपरची पाहणी केली असता त्यावर भारतीय चलनातील 100 आणि 500 रुपयांच्या नोटा छापलेल्या दिसून आल्या परंतु त्या व्यवस्थित छापल्या नसल्याने त्या फाडून कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्या असल्याचे दिसले.सदर खोलीत एचपी कंपनीचा स्मार्ट टॅंक 585 ऑल इन वन हा रंगीत प्रिंटर मिळून आला. रजनीकांत राहणे याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की अलीबाबा ऑनलाईन साइटवरून हाय सिक्युरिटी ट्रेड असलेली रंगीत पट्टी पेपरची ऑनलाईन खरेदी केली होती. सदर पेपरवर तो एचपी कंपनीच्या ऑल-इन-वन प्रिंटरचा वापर करून भारतीय चलनातील खोट्या नोटा बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले. काही खोट्या नोटा व्यवस्थित छापल्या न गेल्याने त्या पाडून फेकून दिल्या असल्याचेही कबूल केले.त्यामुळे गुंजाळवाडी शिवारात सदर ठिकाणी छापा टाकला असता रजनीकांत राहाणे हा ऑनलाइन साईट अलीबाबा या ठिकाणावरून डीटीडीसी या कुरिअर कंपनी मार्फत हाय सिक्युरिटी पेपर मागवून त्याचा बनावट नोटा छापण्याचा प्रयत्न करत असल्याची फिर्याद वरिष्ठ इंटेलिजन्स अधिकारी झाकीर हुसेन मुल्ला यांनी दिली असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.