अहिल्यानगर (प्रतिनिधी):- हातात धारदार तलवार घेऊन दहशत करणाऱ्या तरुणास कोतवाली पोलिसांनी 14 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास खान का शरीफ दर्ग्याजवळ पकडले आहे. शहबाज गफार बागवान (रा. झेंडीगेट) असे पकडलेल्या तरुणाचे नाव आहे.
शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती झेंडीगेट परिसरामध्ये एक तरुण धारदार शस्त्र हातात घेऊन फिरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्री. भारती यांनी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना कळविली व सदरील ठिकाणी कारवाई करण्यास सांगितले.कोतवाली पोलीस ठाण्याचे अंमलदार रात्रगस्त घालत असताना सदरील ठिकाणी गेले असता झेंडगेट येथील त्या दर्ग्यापाशी शहबाज हा संशयितरित्या उभा होता. त्याच्या तोंडाचा उग्र वास येत असल्याने त्याने अमली पदार्थाचे सेवन केले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे धारदार लोखंडी तलवार मिळून आली.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सुरज दिलीप कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहबाज बागवान यांच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती,कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे,पोलीस अंमलदार संदीप पितळे,दीपक रोहकले,तानाजी पवार,सुरज कदम,सचिन लोळगे,अतुल कोतकर,शिरीष तरटे, संकेत धीवर,राम हंडाळ यांनी केली आहे.