अहिल्यानगर (प्रतिनिधी):- शहरातील सारसनगर येथील सिमेंट काँक्रेट च्या रस्त्याच्या कामाच्या सिमेंटच्या गोण्या चोरी करणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यात भिंगार कॅम्प पोलिसांना यश आले आहे.सारसनगर येथील मधुबन कॉलनीत रस्त्याच्या कामासाठी ठेवलेल्या 120 सिमेंटच्या गोण्या कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहेत याबाबत ठेकेदार अमोल ज्ञानदेव नांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भिंगार कॅम्प पोलीस गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,चोरून नेलेल्या सिमेंटच्या गोण्या या विक्रीकरिता बेलेश्वर मंदिराजवळील काटवनात घेऊन येणार आहे.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक इंगळे यांनी सदरील माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना कळवली, पोलीस निरीक्षक मुलगीर यांनी मिळालेल्या माहितीनुसार सदरील ठिकाणी जाऊन कारवाई करण्यासाठी पोलिसांना आदेश दिले. पोलीस पथक मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी जाऊन थांबले असता सिमेंटच्या गोण्या भरलेला एक मालवाहतूक येताना पोलिसांना दिसला पोलिसांनी तात्काळ वाहन ताब्यात घेतले.
राहुल सुनील पोळ (रा. शेलार मळा बुऱ्हानगर), साहिल समीर शेख (रा.यशवंत नगर शिरूर जिल्हा पुणे) व एक विधी संघर्ष बालक आढळून आल्याने त्यांना गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.त्यांच्या ताब्यातून 120 सिमेंटच्या गोण्यासह मालवाहतूक वाहन जप्त करण्यात आले.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती,भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे,पोलीस अंमलदार नंदकुमार पठारे,संदीप थोरात,कैलास शिरसाट,सतीश भांड,कांतीलाल चव्हाण,अमोल आव्हाड यांनी केली आहे.