अहिल्यानगर जिल्ह्यात 933 किलो गांजाचा नाश..अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची धडाकेबाज कारवाई!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अंमली पदार्थ कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील तब्बल 933 किलो 570 ग्रॅम वजनाचा गांजा आणि गांजाची झाडे यांचा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नाश करण्यात आला.
ही कारवाई सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ नाश प्रक्रिया समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक (गृह) जगदीश भांबळ, तसेच पोनि.किरणकुमार कबाडी (स्थानिक गुन्हे शाखा, नोडल अधिकारी अंमली पदार्थ टास्क फोर्स) यांचा समावेश होता.
न्यायालयाची परवानगी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाहरकत प्रमाणपत्रानंतर, ही संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र इन्व्हीरो पॉवर लि., रांजणगाव (ता. शिरूर, जि. पुणे) येथे कायदेशीररित्या पार पडली.या विशेष मोहिमेत जामखेड, तोफखाना, राहुरी, कर्जत, पारनेर, श्रीरामपूर शहर, शेवगाव, मिरजगांव, कोपरगांव, भिंगार कॅम्प, श्रीगोंदा आणि राहाता या पोलीस ठाण्यांतील 20 गुन्ह्यांमधील जप्त अंमली पदार्थांचा नाश करण्यात आला.
कारवाईदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकात पोलीस अंमलदार शामसुंदर गुजर, पंकज व्यवहारे, संतोष खैरे, अतुल लोटके, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे, जालिंदर माने आणि जयराम जंगले यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.ही विशेष मोहिम जिल्हा पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी कारवाईतील आतापर्यंतची मोठी आणि निर्णायक मोहीम ठरली आहे.