सेलू /वर्धा प्रतिनिधी (गजानन जिकार):-गांधी-विनोबांच्या कर्मभूमीत वर्धा येथे,९६ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि.३ ते ५ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे.संमेलनाच्या मुख्य मंडपाला ‘आचार्य विनोबा भावे सभामंडप’ नाव देण्यात आले आहे. तसेच मुख्य प्रवेशद्वारावर, महात्मा गांधी व विनोबांचे मोठे कटआउट लावण्यात आले आहे.रविवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी, ‘मनोहर म्हैसाळकर सभामंडपात ‘गांधीजी ते विनोबाजी : वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष डॉ.विनय सहस्त्रबुद्धे (दिल्ली) हे असून , त्यांचा सरळ संबंध गांधी विचारांची थेट विरोधी संघटना म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघा (rss) सोबत आहे. गांधी विचारांची मांडणी जर गांधी विनोबांच्या विचारांचे विरोधक मांडतील तर ते विचाराशी न्याय्य होईल का ? हा साधा प्रश्न या आयोजकांना का पडला नसावा ! की तेच यांचे उद्दीष्ट आहे हे ही विचार करण्याची आज गरज आहे.या परिसंवादात गोवा,मुंबई,पुणे, नांदेड, नागपूर येथील बरेच विद्वान सहभागी होणार आहेत. पण आश्चर्याची आणि खेदाची बाब अशी की, ज्या गांधी विनोबांच्या कर्मभूमीत हा अखिल भारतीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे, त्या सेवाग्राम-पवनार या परीसरातील गांधी-विनोबांच्या विचाराने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना, विचारवंतांना वा सेवाग्राम-पवनार आश्रमातील कार्यकर्त्यांना व विचारवंतांना परिसंवादात कोठेही स्थान तर देण्यात आलेलेच नाही, पण गांधी-विनोबांच्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना साहित्य संमेलनाचे साधे रीतसर सन्मानपूर्वक निमंत्रणही देण्यात आलेले नाही ! गांधी विनोबांच्या कर्मभूमीतच, त्यांच्या विचाराने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची व संस्थांची उपेक्षा करून त्या विचारांचे विरोधकांना यात विचार मांडण्यासाठी आमंत्रित करावे ही अत्यंत खेदजनक व निषेधात्मक बाब आहे.महात्मा गांधी व विनोबांना वर्ध्यात आणणारे आणि विविध संस्था उभे करणारे जमनालालजी बजाज, आद्य भारतीय कुष्ठसेवक पद्मश्री मनोहर दिवाण, मृतगुरांचे शवच्छेद कार्याचे आद्य प्रवर्तक गोपाळराव वाळुंजकर, सेवाग्राम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल उभारणाऱ्या डॉ सुशीला नैयर, श्रीकृष्णदास जाजू, किशोरभाई मश्रुवाला इ. कार्यकर्ते तसेच ,नई तालीम,मगन संग्रहालय, ग्रामसेवा मंडळ,भारतातील दलितांना खुले झालेले पहिले लक्ष्मीनारायण मंदिर,या गांधी- विनोबांच्या संस्थांचे आयोजकांना विस्मरण व्हावे, त्यांची दखलही घ्यावीशी वाटू नये हे सारे दुःखदायक आहे.असे विजय दिवाण विनोबा जन्मस्थान ट्रस्ट,गागोदे महाराष्ट्र,प्रदीप खेलुरकर सचिव सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान,रमेश दाणे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र सर्वोदय मंडळ,अविनाश काकडे मुख्य प्रेरक किसान अधिकार अभियान आदींनी व्यक्त केले आहे.