शेवगाव प्रतिनिधी(अविनाश देशमुख):-मुला मुलीच्या संख्येतील विषम प्रमाणामुळे अनेक मुलांच्या लग्नाचा प्रश्न बिकट बनलाय,नेमक्या या अडचणीचा फायदा काही जण उठवत असल्याच्या अलीकडे जिल्ह्यात अनेक घटना घडत आहेत.काहींचा तर लग्नाची मुले शोधून त्या कुटुंबास गंडा घालवण्याचा व्यवसाय बनला आहे.अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील कोळगाव येथील एका वर बापाला त्याच्या मुलासाठी सोयरीक दाखवून मुलीला आई-वडील नसल्याने तिचा सांभाळ करणाऱ्या तथाकथित तिच्या मावशीला व मध्यस्थाला चक्क दोन लाख मोजावे लागले.नवरीने त्यावर आणखी कडी केली.मुलाच्या घरी आल्यावर घरातील रोख तीस हजार रुपये व एक लाख ३० हजाराचे १२ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण दोन लक्ष साठ हजाराला गंडा घालून नवरीने घरातून भल्या पहाटे पोबारा केल्याची घटना घडली,या संदर्भात मुलाचे वडीलांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दोन लाख साठ हजार रुपये फसवणुकीची तक्रार दिली आहे.
