अहमदनगर प्रतिनिधी (दि.४ फेब्रुवारी):-अहमदनगर शहर व जिल्ह्यामध्ये नोव्हेल अबॅकस अकॅडमी नावाने ज्योती जांभळे व विक्रम जांभळे या दाम्पत्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून अबॅकसचे चांगल्या पद्धतीने विविध शाखेमध्ये क्लासेस घेतले जातात.त्यापैकी पाईपलाईन रोडवरील गावडे मळा शाखा दहा वर्षांपासून शितल निरगुडे मॅडम घेतात.या गावडे मळा शाखेतील १५ विद्यार्थी अबॅकस परीक्षेत बसले.हे सर्व १५ विद्यार्थी चांगल्या गुणांनी परीक्षेत चमकले.त्यापैकी शंभुराजे अशोक कुटे हा विद्यार्थी पहिल्या लेव्हलमध्ये चॅम्पियन ठरला आहे. सामाजिक कार्यकर्ते अशोक कुटे व जयश्री कुटे यांचा हा मुलगा आहे.तसेच हिंदवी प्रवीण कडूस,मंजुषा बोरकर या दोन विद्यार्थिनी देखील सहाव्या लेवल मध्ये चॅम्पियन ठरल्या आहेत.८ जानेवारी २०२३ रोजी समर्थ विद्यामंदिर या शाळेमध्ये नोव्हेल अबॅकस अकॅडमी मार्फत अबॅकसची जिल्हास्तरीय परीक्षा घेण्यात आली.ऑनलाइन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ही परीक्षा झाली होती,दहा मिनिटांचा हा पेपर असतो.या शिक्षणामध्ये व परीक्षेमध्ये एकूण आठ लेव्हल असतात. प्रत्येक लेव्हल मध्ये सर्वात जास्त प्रश्न सोडवणारा विद्यार्थी हा चॅम्पियन ठरत असतो.या परीक्षेला नगर शहर व जिल्ह्यातून एकूण २४० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. नुकताच या परीक्षेचा निकाल व बक्षीस वितरण समारंभ धर्माधिकारी मळा,आयुर्वेद हॉलमध्ये पार पडला.या बक्षीस वितरणासाठी डॉ.प्रकाश लोखंडे,युवराज म्हस्के,विक्रम जांभळे,ज्योती जांभळे,शितल निरगुडे, रेसिडेन्शिअलचे मोरे सर, भापकर सर,दरेकर सर आदी मान्यवर उपस्थित होते. शितल निरगुडे मॅडम यांच्या गावडे मळा शाखेच्या सर्वच्या सर्व मुलांनी उत्तम यश मिळविल्याबद्दल सर्व पालकांनी त्यांचे कौतुक केले आहे.या अबॅकसच्या शिक्षणामुळे मुलांना गणित विषय सोपा जातो आणि त्याची भीती कमी होते. मुलांची बौद्धिक क्षमता वाढते.भविष्यात स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षा देण्यासाठी मुलांची पूर्वतयारी चांगली होते.त्यामुळे विद्यार्थ्यांनी असे अबॅकसचे शिक्षण घेणे गरजेचे आहे,असे मत अशोक कुटे यांनी व्यक्त केले.

