अहिल्यानगरच्या माळीवाडा येथील कोल्हापूर निवासी श्री महालक्ष्मीदेवी आईचा २३ जुलै रोजी यात्रोत्सव
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर येथील माळीवाडा येथे असलेल्या शहरातील ग्रामदैवत कोल्हापूर निवासी श्री महालक्ष्मीदेवी आईचा यात्रोत्सव बुधवार दि.२३ जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होत असून यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थान व मातंग समाज पंच कमिटीच्या वतीने देण्यात आली.श्री महालक्ष्मीदेवी देवस्थान व मातंग समाज पंच कमिटी माळीवाडा अहिल्यानगर यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सव साजरा करण्यात येतो.या ही वर्षी दिनांक २३ जुलै २०२५ रोजी हा यात्रौत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.
श्री महालक्ष्मीदेवीच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने सकाळी ८ कावड मिरवणूक स्टेट बँक चौकातील मारुती मंदिर येथून निघणार असून ही मिरवणूक जुने जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे बंगाल चौकी, बारा तोटी कारंजा,दत्त मंदिर,माळीवाडा येथील विशाल गणपती मार्गे परिसरात असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिर प्रांगणात येणार आहे.यावेळी आई जगदंबेचा जयघोष करत जगदजननी श्री महालक्ष्मीदेवी आईला पंचामृताचा अभिषेक व नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथून गोदावरी नदीतून आणलेल्या कावडीच्या गंगाजलाने श्री महालक्ष्मी देवीचे मुख्य (भगत) पोपटराव धोंडीबा साठे यांच्या हस्ते घालण्यात येणार आहे.दुपारी १२ वाजता देवीचे मुख्य भगत पोपटराव धोंडीबा साठे यांच्या राहत्या घरापासून देवीच्या पुरातन मुखवटे व पावलांची मिरवणूक पोतराजाच्या उपस्थितीत वाद्याच्या गजरात निघणार आहे
सर्व भाविक भक्तांसमवेत महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये पालखी मिरवणुकीचे आयोजन दुपारी २ वाजता करण्यात येणार आहे. यात पोतराजाची कला नाच असून आराध्यांचा मेळा प्रात्यक्षिके यावेळी वाद्यांच्या निनादात करण्यात येणार आहे.श्री महालक्ष्मीदेवी आईच्या यात्रौत्सवाच्या निमित्ताने सर्व भाविक भक्त व समाज बांधवांनी कोल्हापूर निवासिनी गावठाण आई ,श्री महालक्ष्मी मातेच्या यात्रेत होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहुन महाप्रसादासह दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष उमेश साठे,उपाध्यक्ष केतन साठे,कार्याध्यक्ष आशिष पारधे यांनी केले आहे.