भूमिअभिलेख कार्यालयातील खाजगी इसमाने शेतकऱ्यास बेदम मारहाण करून दिली जीवे मारण्याची धमकी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)-नगर तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील अनागोंदी कारभार शिवसेना (शिंदे गट) यांनी चव्हाट्यावर आणल्यानंतर एक गंभीर प्रकार समोर आला आहे.या कार्यालयात काम करणाऱ्या एका खाजगी इसमाने एका शेतकऱ्याला शिवीगाळ, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दि.७ जुलै रोजी सायंकाळी नगर तालुक्यातील अरणगाव येथे घडली आहे.
याबाबत येथील शेतकरी कचरू कोंडीबा दळवी (रा. अरणगाव,ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी शेळके याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सदरील आरोपी शेळके हा भूमिअभिलेख कार्यालयात खाजगी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. फिर्यादी दळवी यांनी त्याच्याकडे जमिनीच्या मोजणी साठी ३-४ वर्षांपूर्वी पैसे दिले होते. मात्र त्याने ते शासकीय खात्यात भरले नाही, नेहमी उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यामुळे दळवी यांनी पुन्हा भूमिअभिलेख कार्यालयात पैसे भरून जमिनीची मोजणी करून घेतली होती.त्यावेळी शेळके याची भूमिअभिलेख कार्यालयात त्यांनी तक्रार केली होती. तेव्हापासून ते त्यास वारंवार पैसे मागत होते. ७ जुलै रोजी दुपारी ४.१५ च्या सुमारास त्यांची गावात भेट झाल्यावर दळवी यांनी त्यास पुन्हा पैसे मागितले असता तू माझी तक्रार का केली? आता पैसे कशाचे मागतो असे म्हणत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे दळवी यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.
या फिर्यादीवरून शेळके याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नेहमीच तालुका भूमिअभिलेख कार्यालय कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असते नागरिकांची येथे कायमच अडवणूक केली जाते त्यामुळे या कार्यालयात तालुक्यातून आलेल्या नागरिकांना हेलपाटे मारून पुन्हा वापस जावे लागते.