आधार गट सदस्यांनी एकत्र येऊन महिला अत्याचार मुक्तीसाठी काम करावे प्रविण मुत्याल
अहिल्यानगर (१२ जुलै प्रतिनिधी):-“महिलांवरील अन्याय थांबवायचा असेल,तर प्रत्येकाने एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, महिला सक्षम झाल्या पाहिजे. सन्मानाने जीवन जगल्या पाहिजे. आज समाजात पुरुषप्रधान संस्कृती आहे. परंतु महिलांनी सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम केले पाहिजे. गाव महिला अत्याचार मुक्त झाले पाहिजे,त्यासाठी आधारगट सदस्यांनी एकत्र येऊन महिला अत्याचार मुक्तीसाठी काम करावे असे प्रतिपादन स्नेहालय संस्थेचे संचालक प्रविण मुत्याल यांनी केले.

महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी आणि समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्पातील आधारगटातील सदस्यांना सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रविण मुत्याल (संचालक – स्नेहालय), विद्या घोरपडे (प्रकल्प व्यवस्थापक – स्नेहाधार प्रकल्प), अमर पाटील ( समुपदेशक – स्नेहाधार प्रकल्प), रुपाली सोयम ( समुपदेशक) आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत विविध गावातील आधारगटांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विद्या घोरपडे यांनी कार्यशाळेत महिलांच्या हक्कांची माहिती, आत्मरक्षणाचे उपाय, कायदेशीर मदत मिळवण्याचे मार्ग यावर माहिती दिली. तसेच, महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी गावातील प्रतिनिधित्व करणाऱ्या स्नेहमित्रांनी आपआपल्या कामाचे अनुभव कथन केले.
कार्यशाळेच्या शेवटी सहभागी सदस्यांनी महिला अत्याचारविरोधी लढ्यात सक्रियपणे सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन मनीषा शिंदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कोमल मोकळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदाकिनी मोकळे, सिद्धार्थ दाभाडे, प्रतीक्षा अम्बोरे, कावेरी रोह्कले आदींनी परिश्रम घेतले.
प्रकल्प व्यवस्थापक-विद्या घोरपडे-९०११३६३६००
