स्नेहदीप केंद्राचे सोमवारी भव्य लोकार्पण..सभापती राम शिंदे,पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांची प्रमुख उपस्थित
अहिल्यानगर प्रतिनिधी (दि.9 ऑगस्ट):-वृद्धत्व, कॅन्सर, विस्मृती, अपघात, अर्धांगवायू , शस्त्रक्रियेनंतर आवश्यक सुश्रुषा इत्यादी कारणांनी परावलंबित्व आलेल्या रुग्णांसाठी दर्जेदार निवासी सेवा आणि सुश्रुषा देणारा उपक्रम *स्नेहदीप रुग्णसेवा केंद्र* मागील 6 वर्षांपासून स्नेहालय संस्था चालविते. संस्थेच्या स्नेहदीप उपक्रमाच्या तिसऱ्या सुसज्ज वास्तूचे लोकार्पण सोमवार दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी होत आहे. केडगाव मधील मॅक्डोनल्ड पाठीमागे, स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र समोर नूतन स्नेहदीप संकुल बांधण्यात आले आहे दुपारी 4 वाजता होणारा स्नेहदीप चा लोकार्पण सोहळा सर्वांसाठी खुला असल्याचे स्नेहालय संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती जया जोगदंड आणि सचिव डॉ. प्रीती भोम्बे यांनी सांगितले.
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील 30% जागा या अत्याचारित आणि बळी महिलांसाठी राखीव आणि पूर्णतः मोफत असणार आहेत. उर्वरित जागांवर परवडणाऱ्या शुल्कात रुग्णसेवा दिली जाणार आहे. वंचित महिलांचा आजारपणाचा आणि वृद्धत्वाचा काळ सुसह्य करणारा हा पहिलाच उपक्रम आहे. सध्या तिन्ही स्नेहदीप प्रकल्पात मिळून एकत्रितपणे 110 रुग्णांसाठी सेवा उपलब्ध झाली आहे.
लोकार्पण सोहळ्यास विधान परिषदेचे सभापती ना.राम शिंदे, पद्मभूषण अण्णासाहेब हजारे , पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, आधार आपुलकी फाउंडेशनचे संस्थापक हेमंत लोहगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे संस्थेच्या खजिनदार गीता कौर , विश्वस्त सपना आसावा, डॉ. अंशू मुळे ,संचालक अनिल गावडे, हनीफ शेख आणि प्रवीण मुत्याल यांनी सांगितले.
सामाजिक सहयोग
स्नेहदीप संकुलातील तिसऱ्या मजल्यास महाराष्ट्रातील नामवंत सामाजिक कार्यकर्ते दांपत्य स्वर्गीय आशाताई आणि देवचंद मथुरदास शेठ यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबातील लायन चंद्रशेखर शेठ आणि सौ.शैला शेठ, सौ. वंदना संजीव शेठ, सौ. शोभा अरुण मेहता, श्री. सतीश मेहता, डॉ. प्रकाश शहा यांनी बांधकामासाठी सहयोग दिला.बांधकामात सहयोग देणाऱ्या ठाणे येथील एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नाव दुसऱ्या मजल्याच देण्यात आले आहे. एसएमसी कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील अनेक संस्थांचे आधारवड असलेले अरुण रामचंद्र शेठ यावेळी उपस्थित राहणार आहेत.
काळाची गरज
भारतात विविध कारणांनी परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांची संख्या 12 कोटी हून अधिक आहे. भविष्यात वृद्धांची संख्या आणि समस्या भारतात वाढणार आहे. अशावेळी वृद्धाश्रम हॉस्पिटल आणि घर यांचा सुवर्णमध्य साधणाऱ्या स्नेहदीप सारख्या प्रकल्पांची देशाला गरज आहे. या उपक्रमाच्या. माध्यमातून स्नेहालयाने आपल्या विविध उपक्रमातून पुनर्वसित झालेल्या 39 व्यक्तींना रोजगार दिलेला आहे.सेवा सुश्रुषा क्षेत्रात असणारी रोजगार संधी लक्षात घेऊन मागील वर्षीपासून स्नेहालय रुग्ण सहाय्यक अभ्यासक्रम चालविते. या माध्यमातून अल्प. शिक्षण झालेल्या परंतु सेवेची आवड असलेल्या तरुण मुला-मुलींना 3 महिन्यांचे प्रशिक्षण आणि रोजगार मोफत उपलब्ध करून दिला जातो. स्नेहदीप उपक्रमाच्या वास्तूत तळमजल्यावर रुग्णसहाय्यक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाते.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी येथे संपर्काचे आवाहन संस्थेने केले आहे. 8600484444