फनफेअर मधील तरुणाच्या डोक्यावर वार..सहा टाके..तोफखान्यात गुन्हा दाखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- शहरातील नगर-मनमाड रोडवर लहान मुलांना मनोरंजन म्हणून तसेच खेळण्यासाठी फनफेअर आकाश पाळणा लावणाऱ्या विशाल देवदंड गायकवाड (वय २८,रा. त्रिवेणी नगर,तळवडे,जि. पुणे) यांच्यावर पैशाच्या वादातून दोन तरुणांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना 15 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे.
विशाल यांच्या डोक्याला गंभीर जखम होऊन सहा टाके पडले असून तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार,मारहाण करणाऱ्या दोन तरुणांपैकी एकाला फनफेअरसाठी परवाने काढण्याचे काम आणि त्यासाठी रोख रक्कम दिली होती.१२ ऑगस्ट रोजी त्या तरुणाने लाइटबिल आणि ग्राऊंड मालकाचे पैसे बाकी असल्याचे सांगत विशाल यांच्या तीन गाड्यांच्या चाव्या ताब्यात घेतल्या.१५ ऑगस्ट रोजी विशाल यांनी सावेडीतील महावितरण कार्यालयात लाइटबिल भरल्यानंतर त्यांना चाव्या परत मागितल्या.मात्र,त्याने विशाल यांना एमएससीबीची एनओसी मागितली आणि न देण्यावरून शिवीगाळ केली.रात्री १०:३० वाजता त्या दोघा तरुणांनी विशाल यांच्यावर हल्ला चढवला.एकाने लोखंडी रॉडने विशाल यांच्या डोक्यावर वार केले, तर दुसऱ्याने लाकडी दांडक्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली.अधिक तपास पोलीस करीत आहे.