भारतमातेसोबत अत्याचारग्रस्त मुक्तानेही अनुभवला तिचा स्वातंत्र्य दिन..
अहिल्यानगर (दि.१९ ऑगस्ट २०२५ प्रतिनिधी):-१५ ऑगस्ट २०२५ रोजी भारतमातेचा ७९ वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा होत असतानाच तिच्या एका दुर्दैवी लेकीनेही स्वातंत्र्याची अनोखी अनुभूती घेतली. सुमारे ६ महिन्यांची गर्भवती असलेल्या अवघ्या १२ वर्षांच्या मुक्ताची ( बदललेले नाव )अमानवी अत्याचार आणि ओटीपोटातील असह्य वेदनांमधून मुक्तता झाली. हातात तिरंगा घेऊन जल्लोष करणाऱ्या स्नेहालय टीमचा आनंद मुक्ताच्या स्वातंत्र्यामुळे शतगुणित झालेला होता…

स्नेहालयात दरवर्षीचा स्वातंत्र्य दिन हा संस्थेसाठी सर्वात महत्त्वाचा उत्सव असतो. कारण या दिवशी संस्थेतील सर्व बालकांचा “सामूहिक वाढदिवस” साजरा होतो. भारताच्या स्वातंत्र्यदिनी हा जन्मदिन साजरा होत असताना संस्थेचे शेकडो माजी आणि विद्यमान विद्यार्थी , गावोगाव काम करणारे कार्यकर्ते, आपले समर्पण निरपेक्षतेने देणारे दाते स्नेहालयात एकत्र येतात. येथील अनाथ, शारीरिक आणि मानसिक समस्यांनी ग्रस्त लाभार्थी, देहव्यापार आणि बालविवाहातून मुक्त झालेली बालके, बालमाता असे सर्वजण एकमेकांच्या सुखदुःखांशी समरस होण्याचा हा दिवस असतो.
पायाखालची वाळू सरकली
स्वातंत्र्य दिनाचा आनंदोत्सव साजरा करीत असतानाच आलेल्या एका मोबाईलमुळे स्नेहालय टीमच्या पायाखालची कप सरकली.राहुरी येथील सामाजिक जाणीव जपणाऱ्या डॉक्टरांनी डॉ. गिरीश कुलकर्णी यांना फोन करून एक माहिती दिली. त्यांच्यासमोर एक लहान मुलगी वेदनांनी विव्हळत होती.११ वर्ष नुकतेच पूर्ण करून तिचे बाराव्या वर्षात पदार्पण झाले होते.२९ किलो वजन,एचबी फक्त ८, आणि पाच महिन्यांची गर्भवती.तिच्या कष्टकरी अडाणी आई-वडिलांना मुलगी काय परिस्थितीत आहे याची काहीच कल्पना नव्हती.तीव्र पोटदुखीच्या आणि रक्तस्त्रावाच्या तक्रारीवर राहुरीतील हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी केल्यावर हे हादरवून टाकणारे.सत्य समोर आलं.बालहक्कांच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या स्नेहालय संस्थेच्या उडान आणि मुक्ती वाहिनीचे प्रमुख प्रवीण कदम आणि जुनी हे स्वयंसेवक ही अस्वस्थ करणारी खबर मिळाल्यापासून एक तासात राहुरीला पोहोचले. परंतु सत्य कळाल्यावर आकाश कोसळलेले पालक मुलीला घेऊन सैरावैरा धावत सुटले होते. त्यांची शोधाशोध सुरू झाली. शेवटी विळद गावातील एका क्लिनिकमध्ये मुक्ता सापडली. ती वेदनेने तडफडत आणि विव्हळत होती.सीमाने तिचा हात धरून थोपटत धीर दिला. तिला स्नेहालयच्या मदतीने तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले.रात्रभर तपासण्या सुरू होत्या. विमनस्क अवस्थेतील आई-वडील पाणी देखील पीत नव्हते. दवाखान्याच्या एका कोपऱ्यात ते रडत नशिबाला दोष देत बसले होते.स्नेहालय टीममधील कार्यकर्ती प्रतीक्षा काळे , संतोष धर्माधिकारी यांनी स्नेहालयातून आणलेले जेवण त्यांना समजावून सांगत शांत करत चारले.
अस्वस्थ करणारी सत्यकथा…
दुसऱ्या दिवशी पोलिसांत बाललैंगिक शोषण आत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तक्रार दाखल करण्यासाठी नातेवाईकांना मुक्तीवाहिनी टीमने एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुक्तीवाहिनी टीम मधील शाहीद शेख याने मुक्तासह कुटुंबाची भीती संवाद आणि समुपदेशनाने कमी केली.तेव्हा सत्य समोर आले. मुक्ताचा सख्खा मावस भाऊ कोवळ्या वयातील मुक्तावर सातत्याने बलात्कार करत होता. वर धमक्या देत होता, “तोंड उघडलंस तर कायमचे संपवीन.” मुक्ताचे आई-वडील मजुरीसाठी बाहेर जायचे घरात फक्त मुक्ता आणि लहान भाऊ. काही वेळा या भावाला सुद्धा धमक्या देऊन घराबाहेर काढले जायचे आणि कार्यभाग उरकला जायचा. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ( पॉस्को ) या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. आरोपीला गुन्हा नोंदल्या झाल्यापासून काही तासातच अटक झाली.
करपलेले बालपण
पोलीस ठाण्यात कायदेशीर कार्यवाही चालू असतानाच मुक्ताला अचानक रक्तस्त्राव सुरू झाला. तिला सावरून उचलून दवाखान्यात नेताना मुक्तिवाहिनी टीम मधील कार्यकर्त्यांचे कपडे रक्ताने माखले. काही मिनिटातच मुक्ता जिल्हा शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात दाखल होती. वेदनांचा कल्लोळ अनुभवत तिने बाळाला जन्म दिला. पण मुक्ताच्या बाळाने मोजके सहा श्वास घेतले आणि त्याचे श्वास थांबले.डॉक्टरांनी मुक्ताला मात्र वाचवलं.अर्थात या भीषण अनुभवाने मुक्ताचे बालपण मात्र पूर्णतः करपले. ती अबोल झाली. लोक तिच्याकडे विचित्र नजरेने पाहतात. त्यामुळे ती सतत जमिनीकडे पाहते.स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी फक्त मुक्ताला वैद्यकीय मदत मिळवण्याचे आव्हान मुक्तीवाहिनी टीम समोर नव्हते , तर माणुसकी आणि एक बालपण वाचवण्याची तसेच या प्रकरणातील सत्य शोधण्याची ती अत्यंत कठीण लढाई होती. यात एकेक क्षण महत्वाचा होता.गुप्तता, समन्वय , कर्तव्यदक्षता आणि समवेदना या चतु: सुत्रीचा अविष्कार करीत..प्रविण कदम, सीमा जुनी, शाहिद शेख, पूजा दहातोंडे, संतोष धर्माधिकारी, निलेश सरोदे, राहुल वैराळ या मुक्तीवाहिनीच्या मुक्तीवाहकांनी मुक्ताचे प्राण वाचवले आणि आरोपी जेरबंद केला.आरोपीला जेरबंद करताना आरोपीच्या समाजाच्या दबावाला तोंड द्यावे लागले.ही लढाई येथेच थांबलेली नाही. मुलीचे संपूर्ण पुनर्वसन ,शिक्षण आणि आरोपीला कठोर शिक्षा होईपर्यंत ही लढाई लढण्याचा निर्धार स्नेहालयाचे संचालक हनीफ शेख यांनी व्यक्त केला..
लेखन..हनिफ शेख, संचालक:-स्नेहालय