शेतकऱ्याचा चोरीस गेलेला जेसीबी मोठया शिताफिने हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शेतकऱ्याचा चोरीस गेलेला जेसीबी मोठया शिताफिने हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश मिळाले आहे.बातमीची हकिगत अशी की,दि.22 ऑगस्ट 2025 रोजी पहाटेच्या सुमारास (मातुलठाण, ता.श्रीरामपूर) येथुन शेतकरी शिवाजी बलभिम लहारे (रा. मातुलठाण,ता.श्रीरामपूर) यांच्या घरासमोर त्यांचे नातेवाईक जिवन किसन कुटे,रा.जुन्नर यांच्या मालकीचा पिवळया रंगाचा जेसीबी क्र MH 14 KW 3874 हा अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला होता.याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर 404/2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 (2) प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी यांचे साधानाचे चोरी उघडकीस आणणेबाबत आदेश दिले आहेत.दिलेल्या आदेशानुसार पोनि.कबाडी यांनी पथक तयार करुन सदर पथकास चोरीचे गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना करण्यात आले होते.सदर पथक गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी करत असतांना,गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की,सदरचा गुन्हा हा इसम नामे अशोक हरिभाऊ राशिनकर (रा.नायगांव, ता.श्रीरामपूर) याने केला आहे.
त्यावरुन पथकाने व्यवसायिक कौशल्य आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदर इसमाचा शोध घेतला असता तो मिळुन आला.त्यांस गुन्हयातील चोरीस गेलेला जेसीबीबाबत विचारपूस केली असता,त्यांने गुन्हा केल्याची कबुली देवून, सदरचा जेसीबी हा त्यांचे ओळखीचे कैलास सावित्रा रोडे, रा.येठेवाडी,ता.संगमनेर येथे वस्तीवर लावलेला असल्याबाबत सांगितले.त्यानुसार पथकाने सदर ठिकाणी जावुन सदर गुन्हयातील चोरीस गेलाला जेसीबी पंचनामा करुन,गुन्हयाचे तपास कामी जप्त केला आहे.सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार पोहेकॉ/ विजय पवार,पोकॉ/किशोर आबासाहेब शिरसाठ,पोकॉ/ रमिजराजा रफिक आतार,पोकॉ/अमृत शिवाजी आढाव आणि पोहेकॉ/फुरकान शेख यांनी केलेली आहे.