तू बुद्धी दे..तू तेज दे..म्हणत मनोयात्रींचे गणरायाला साकडे.
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-गणेशोत्सव साजरा करणाऱ्या स्नेह मनोयात्री प्रकल्पातील मनोयात्रींनी ( मानसिक आजारी) गणरायाला मनोबलासाठी अनोख्या पद्धतीने साकडे घातले.पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याची शपथ घेत स्नेहालय संस्थेच्या हिम्मतग्राम आणि मानसग्राम प्रकल्पात त्यांनी वृक्ष लागवड केली .तसेच गोठ्यातील जनावरांशी भावनिक नाते जोडण्यासाठी त्यांच्या नित्यसेवेचा संकल्प केला…

भारतातील रस्त्यावर भटकणाऱ्या बेवारस मनोरुग्णांना मोफत उपचार , रोजगाराचे कौशल्य प्रशिक्षण देत त्यांच्याच कुटुंबात पुनर्घटन मनोयात्री प्रकल्पाद्वारे केले जाते. स्नेहालय संस्थेच्या मानस ग्राम प्रकल्पांतर्गत हे काम चालते. आजवर 800 रुग्णांचे यशस्वी कौटुंबिक पुनर्वसन करणाऱ्या या संस्थेत सध्या भारत-बांगलादेश इ ठिकाणचे 57 निवासी रुग्ण आहेत.या उत्सवामुळे मनोयात्रींना कौटुंबिक आणि धार्मिक वातावरणाचा अनुभव मिळतो आहे.उत्सवासाठी गणपती मंडप सजावट, रांगोळी, गणपती पूजा, स्पर्धा, स्वच्छता हे सर्व मनोयात्री लाभार्थींनी स्वतःच केले. यानिमित्ताने प्रकल्पात पुढील दहा दिवस संगीत खुर्ची, लिंबू चमचा, संगीताचे कार्यक्रम, नृत्य, गायन, भजन, वादन, अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
गणपती मंडप सजावटीसाठी निसर्गमय वातावरण येण्यास मातीचा डोंगर उभा करण्यात आला. तेथे हिरवळ विकसित करण्यात आली.गणरायासाठी झाडांच्या पानातून मनोयात्रींनी कल्पकतेने हार बनवले.फुलांची सजावट करण्यात आली.गणपतीच्या समोर आणि परिसरात सुंदर रांगोळी रुग्णांनी काढल्या.या उपक्रमात समीक्षा पवार, निकिता फुंडे, सोनाली साळवे, भारत तिडके, सोनू शहा, परी सूर्यवंशी, वेणू आंग्रे आणि समन्वयक रमाकांत डोड्डी आदींनी विशेष मेहनत घेतली.
आपला नम्र प्रवीण मुत्याल.मो.9011026485
