इस्लाम धर्माच्या प्रेषितांचा अवमान करणाऱ्या भंडारीच्या अटकेची मुस्लिम महिला व समाजाची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ.व.) यांच्याबाबत सोशल मीडियावर अपशब्द बोलून तसेच मुस्लिम महिलांचा अवमान करणाऱ्या राजेंद्र भंडारी याच्या विरोधात समस्त मुस्लिम महिला समाजाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात आज दुपारी ३ वाजता शहरातील मुस्लिम महिलांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर निवेदन सादर करण्यात आले.यावेळी माजी नगरसेविका नसिम शेख म्हणाल्या की, “धर्मीय भावना भडकविणारे आणि महिलांचा अवमान करणाऱ्यांना कायद्याने कठोर शिक्षा झाली पाहिजे. प्रशासनाने अशा प्रवृत्तीला थारा देऊ नये. समाजात शांतता व बंधुता राखण्यासाठी दोषींवर त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे.”

निवेदनात नमूद करण्यात आले की, भंडारी याने मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून महिला वर्गाचा अपमान केला आहे. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने याप्रकरणी तातडीने कठोर भूमिका घेतली नाही, तर महिलांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.