अहिल्यानगर जिल्ह्यात ५४९ शिवपाणंद शेतरस्त्यांना मंजुरी..शिव पाणंदमुळे मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेस पुनर्जिवन-शरद पवळे
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-ग्रामीण भागातील शेतरस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी राज्य सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यात ५४९ शेतरस्त्यांना मंजुरी दिली आहे.या निर्णयामुळे गावोगावी शेतकऱ्यांना संपर्कसुविधा उपलब्ध होऊन समृद्धीचा मार्ग सुकर होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी सांगितले.शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे शासनाला निर्णय घ्यावा लागला.आता प्रत्येक शेतकऱ्याला दर्जेदार रस्ता मिळून देणे हेच आमचे ध्येय आहे.

शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धी हा नारा प्रत्यक्षात उतरत आहे.११ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या शासननिर्णयानुसार मोफत मोजणी शुल्क, पोलिस संरक्षण,शेतरस्त्यांचे सीमांकन व मजबुतीकरण या तरतुदी करण्यात आल्या होत्या. न्यायालयीन आदेशानंतर शासनाने नव्याने मातोश्री शेत-पाणंद योजना सुरू करून अर्धा ते एक किलोमीटर लांबीचे शेतरस्ते गावागावांत मंजूर केले आहेत.ही कामे मनरेगा अंतर्गत पार पडणार असून ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीबरोबरच शाश्वत विकासाला चालना मिळेल.
