नळदूर्ग येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करा मनसेची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नळदूर्ग प्रतिनिधी (अजित चव्हाण):- नळदुर्ग येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करून लवकरात – लवकर कार्यान्वित करून शहर व परिसरातील नागरिकांना सोयीचे करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री व महसूल विभागाकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदनाद्वारे दि-१० फेब्रुवारी रोजी केली आहे,दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, नळदूर्ग शहर हे एक ऐतहासिक शहर असून, जवळपास ६०-७० गावातील लोकांचा दररोज संपर्क शहराशी येतो, नळदूर्ग व जळकोट महसूल मंडळात एकूण ३३ गावे असून पोलिस ठाणे हद्दीत ६०-७० गावांचा समावेश आहे. नळदूर्ग हे निजामकाळात जिल्ह्याचे ठिकाण होते तसेच येथे मामलेदार कचेरी, व मुंसिफ कोर्ट ही होते. तुळजापूर हे तालुक्याचे ठिकाण झाल्यावर ही नळदूर्गचे ऐतिहासिक महत्त्व कमी होऊ नये म्हणून मुन्सिफ कोर्ट अनेक वर्ष नळदूर्ग येथेच होते. सद्याचे तुळजापूर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ व लोकसंख्या पाहता नळदूर्ग तालुक्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. व तशी मागणी अनेक वर्षापासून आहे,आम्ही मनसेच्या वतीने तत्कालीन ठाकरे सरकारकडे २१ पानी अहवाल सादर करून त्यात संकल्पित नळदूर्ग तालुका व त्या बाबत विविध तालुका – जिल्हा पुनर्रचना समित्यांचा अहवाल व इतर माहिती समाविष्ट केली होती,तूर्तास प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय मंजूर करून ते कार्यान्वित झाल्यास ६० – ७० गावातील जवळपास दीड लाख लोकांना त्याचा कार्यालयीन बाबतीत फायदा होणार आहे. व या अगोदर २०१९ मध्ये तत्कालीन महसूल मंत्रालयाने महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांना तातडीने अहवाल मागवून प्रशासकीय प्रस्ताव सादर करन्याच्या सूचना दिल्या होत्या.अनेक वर्ष हा विषय रेंगाळत पडला असून, शहरासह ६० – ७० गावातील लोकांची गरज पाहता नळदूर्ग येथे लवकरात – लवकर अप्पर तहसील कार्यालय होणे गरजेचे आहे.अशी निवेदनात मागणी केली आहे,निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलीम शेख, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर संघटक रवि राठोड यांच्या स्वाक्षरी आहेत.