शिर्डीतील दोन वर्षांपूर्वीच्या महिलेच्या खुनाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने असा आणला उघडकीस..आरोपीस जेरबंद करण्यात मोठे यश
अहिल्यानगर (प्रतिनिधी):–दि.19 मार्च 2024 रोजी सावळीविहीर बु.ता. राहाता येथील के.के.मिल्क जवळील दगडाच्या खाणीमध्ये अंदाजे 30 ते 35 वर्षे वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला सदर घटनेची नोंद शिर्डी पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू (रजिस्टर नं. 32/2023, सीआरपीसी 174) म्हणून करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदन अहवालानुसार महिलेचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाल्याने शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. 287/2024, भादंवि कलम 302, 201 प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होऊनही आरोपीचा ठावठिकाणा लागत नसल्याने श्री.सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला न उघड खुनांचे गुन्हे शोधून काढण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पोउपनि दिपक मेढे, पोलीस अंमलदार विजय पवार, ह्रदय घोडके,लक्ष्मण खोकले, दिपक घाटकर,रमीझराजा आतार,सुनिल मालणकर, भगवान धुळे यांचा समावेश होता.गोपनीय माहिती आणि सातत्यपूर्ण तपासाच्या आधारे या पथकाने संशयित इसम आकाश मोहन कपिले (वय 28 वर्षे, रा. विठ्ठलवाडी, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने कबुली दिली की,त्याचा मानलेला मामा संदीप रावसाहेब झावरे याच्यासोबत तो शिर्डी बसस्टँड येथे प्रवासी बुकींगचे काम करत होता.त्यावेळी भिक्षा मागणारी अनोळखी महिला त्याला ‘‘तु माझा नवरा आहे’’ असे वारंवार बोलत असे.त्यामुळे लोक त्याची चेष्टा करत होते.या रागातून त्याने दि.17/03/2023 रोजी आपल्या होडा कंपनीच्या डिओ मोपेड (क्रमांक MH17BW6950) वर बसवून त्या महिलेचा शिर्डी बसस्टँड वरून नेऊन सावळीविहीर शिवारातील के.के.मिल्क जवळील दगडाच्या खाणीत गळा आवळून खून केला आणि मृतदेह खाणीमध्ये टाकला.
या कबुलीजबाबावरून दोन वर्षांपूर्वीचा रहस्यमय खुनाचा गुन्हा उघडकीस आला असून आरोपी आकाश मोहन कपिले यास ताब्यात घेऊन शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. 287/2024, भादंवि कलम 302, 201 प्रमाणे दाखल प्रकरणी हजर करण्यात आले आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशनमार्फत सुरु आहे.ही कारवाई सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, हिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
