हिवरगाव पावसा येथील ज्येष्ठ संबळ वादक लोककलावंत बाजीराव भालेराव यांचे निधन
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-हिवरगाव पावसा (ता. संगमनेर) येथील ज्येष्ठ संबळ वादक लोककलावंत बाजीराव तुकाराम भालेराव (वय 76) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. तब्बल 50 वर्षे संबळ वादनाच्या क्षेत्रात योगदान देत त्यांनी गावासह पंचक्रोशीत आपला लौकिक निर्माण केला होता.त्यांच्या निधनाची बातमी समजताच सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष (उपाध्यक्ष) श्रीकांत भालेराव, मास्टर रघुवीर खेडकर, राजहंस दूध संघाचे संचालक डॉ. प्रमोद पावसे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, सरपंच सुभाष गडाख, गणेश दवंगे, मास्टर विलास कुमार (राज) गायकवाड देवठाणकर, सौ. शेषकन्या पुणेकर (लोकनाट्य तमाशा मंडळ, संगमनेर), भारत नागपूरकर, सविता पुणेकर, सुनील औरंगाबादकर आदी मान्यवर व कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.
बाजीराव भालेराव आपल्या संबळ व सनई वादनाच्या अनोख्या शैलीसाठी ओळखले जात. हिवरगाव पावसा हे कलावंतांचे गाव म्हणून प्रसिद्ध असून, आद्य नृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर व कलाभूषण लहुजी भालेराव यांच्या समृद्ध कलावारशाचा ठेवा जुन्या पिढीतील कलाकारांनी जपला. त्यात बाजीराव भालेराव यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. “संगीत हाच ध्यास आणि संगीत हाच श्वास” या मंत्राने त्यांनी अखेरपर्यंत कला साधना केली.त्यांच्या पश्चात पत्नी जमुनाबाई, मुले सचिन, महेंद्र, महेश, मुली मनीषा व शारदा, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचा अंत्यसंस्कार मंगळवार, दि. 30 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता हिवरगाव पावसा येथील हनुमान मंदिरासमोरील सामाजिक सभागृहात होणार असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.