वंचित घटकांना शासनाच्या सर्व सेवा देण्यास महसूल विभाग कटिबद्ध स्नेहालय संस्थेत आयोजित कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांचे प्रतिपादन
अहमदनगर,दि.३० सप्टेंबर (प्रतिनिधी):वंचित घटक व अनाथ मुलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे ही महसूल विभागाची जबाबदारी असून,त्यासाठी महसूल विभाग नेहमीच पुढाकार घेईल,असे प्रतिपादन सुधीर पाटील (उपविभागीय अधिकारी,अहिल्यानगर) यांनी केले.ते स्नेहालय संस्थेत आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करत होते.
छत्रपती शिवाजी महाराज स्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस (१७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर) या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत महसूल विभागामार्फत स्नेहालय संस्थेतील मुलांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला.या वेळी आयुष्यमान भारत कार्ड वितरण, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ, अनाथ मुलांची रेशन कार्डे, तसेच आधार कार्ड काढणे व अपडेट करणे अशी महत्त्वाची कामे करण्यात आली.
कार्यक्रमात तहसीलदार अहिल्यानगर श्री. संजय शिंदे म्हणाले, “स्नेहालयसारख्या संस्था समाजातील वंचित घटकांसाठी मोठे कार्य करीत आहेत. अशा संस्थांना महसूल विभागाचा कायमचा पाठिंबा राहील. दरवर्षी अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस आहे.या प्रसंगी अपर तहसीलदार श्री. स्वप्निल ढवळे, नायब तहसीलदार श्री. अभिजीत वांढेकर, श्री. गणेश भानवसे, मंडळ अधिकारी श्री. शेखर साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करण्यासाठी नागपूर विभागाचे मंडळ अधिकारी शेखर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग पंधरा दिवस छाननीचे काम पार पाडण्यात आले. यामध्ये अजित पवार (संजय गांधी निराधार), गणेश आगळे (नवनागापूर तलाठी), शिवम भालेराव (नागापूर तलाठी), शशिकांत मोरे (निंबळक तलाठी), भाऊसाहेब आडोळे (खारे कर्जुने), श्रुती डुंबरे (पुरवठा निरीक्षक) यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्नेहालय संस्थेतर्फे अनिल गावडे, डॉ. प्रीती भोंबे, ऍड. श्याम असावा, प्रकल्प संचालक हनीफ शेख, प्रवीण मुत्याल, संजय बंदिष्टी, सपना असावा, गीता कौर, चंद्रकांत शेंबडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान धालगुडे यांनी केले, सूत्रसंचालन प्रवीण राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन कावेरी रोहकले यांनी मानले.