उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक मालमत्ता व रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती..विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविला स्वच्छतेचा व सुरक्षिततेचा संदेश
बारामती (प्रतिनिधी/मनीषा बंडगर):- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून, बारामती वाहतूक शाखा आणि विद्या प्रतिष्ठान सुपे यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सार्वजनिक मालमत्तेचा सुयोग्य वापर आणि रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.
शहरातील महत्त्वाच्या चौकांत, बसस्थानक, रेल्वे स्थानक व एमआयडीसी परिसरात फलक लावून नागरिकांना संदेश देण्यात आला. या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
🚨 नियम पाळा, अपघात टाळा- पो.नि.चंद्रशेखर यादव
वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नागरिकांना आवाहन केले की, “रस्ते सुरक्षा नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतील. प्रशासनास सहकार्य करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.”
🎓 शाळकरी विद्यार्थ्यांद्वारे जनजागृती- डॉ. संजय काळे
विद्या प्रतिष्ठान सुपे संकुलाचे प्राचार्य डॉ. संजय काळे म्हणाले, नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या शैक्षणिक परिसंवादाच्या धर्तीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्य अधिकारी सुनील मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे.
“विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणे सुस्थितीत ठेवण्याचा संदेश देऊन तो थेट त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचविणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे,” असे ते म्हणाले.
🌿 नागरिकांनी सार्वजनिक मालमत्तेची काळजी घ्यावी- सुनील मुसळे
विशेष कार्य अधिकारी सुनील मुसळे यांनी सांगितले की, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीत दर्जेदार व पर्यावरणपूरक सार्वजनिक इमारती उभ्या राहत आहेत. या इमारती ही आपली संपत्ती आहे, त्यामुळे त्यांचे विद्रुपीकरण होणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यावी.”