अहिल्यानगरच्या राजकारणावर काळाचा घाला..!जिल्हा बँकेचे अध्यक्ष व आमदार शिवाजी कर्डीले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन;राजकीय,सामाजिक क्षेत्रात शोककळा
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- अहिल्यानगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डीले (वय 66) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे.राहुरी विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या कर्डीले यांनी सहकार,शिक्षण आणि कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. शेतकरीहितासाठी अनेक योजना राबवून त्यांनी ‘शेतकऱ्यांचा आमदार’ अशी ओळख निर्माण केली होती. जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे कार्य हाती घेतले होते.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच राहुरी,नगर आणि परिसरातील जनतेमध्ये शोककळा पसरली. अनेक राजकीय नेते, सहकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत त्यांच्या पार्थिवावर श्रद्धांजली अर्पण केली.
राजकारणात जमिनीवर राहून काम करणारा आणि सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा नेता म्हणून शिवाजी कर्डीले यांचे नाव सदैव स्मरणात राहील, असे मत अनेकांनी व्यक्त केले.त्यांच्या पश्चात परिवार,नातेवाईक तसेच नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत. आणि असंख्य कार्यकर्त्यांचा मोठा समुदाय आहे.अहिल्यानगरच्या राजकीय विश्वात आज एक युग संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
