अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा आरोपी गुजरात मध्ये जेरबंद.. एलसीबी पोलिसांची राज्याबाहेरील धडाकेबाज कारवाई..!
अहिल्यानगर (दि.17 ऑक्टोबर 2025):- श्रीगोंदा तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला गुजरात राज्यातून पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर पोलिसांनी मोठे यश मिळविले आहे. गुजरात राज्यात राबवलेल्या या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा चपळ तपासाची

छाप उमटवली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील तक्रारदार यांची 17 वर्षांची मुलगी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेली होती. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 247/2025, भा.न्याय संहिता 2023

कलम 137(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अपहरणानंतर मुलगी शोधूनही न मिळाल्याने नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्वतः उपोषणकर्त्यांची भेट घेत तात्काळ शोधमोहीम सुरू करण्याचे आश्वासन दिले व स्थानिक गुन्हे शाखेस आरोपीचा मागोवा घेण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकात पोउपनि दिपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, रिचर्ड गायकवाड, सोमनाथ झांबरे आणि महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत यांनी सहभागी होत तांत्रिक माहिती व कौशल्याच्या आधारे तपासाची दिशा गुजरात राज्याकडे वळवली.

शेवटी या पथकाने सुरत, गुजरात येथे धडक देत निलेश उर्फ सोन्या अशोक सावंत (वय 29, रा. चिंभळी, ता. श्रीगोंदा) यास अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांनाही बेलवंडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या दक्ष पथकाने केली असून नागरिकांकडून पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कामगिरीचे कौतुक होत आहे.
