उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुऱ्हाणनगरला भेट;स्व.आमदार माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन
अहिल्यानगर (दि.१९ प्रतिनिधी):-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बुऱ्हाणनगर येथे दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी स्व. कर्डीले यांचे सुपुत्र अक्षय कर्डीले, आमदार संग्राम जगताप, तसेच कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. त्यांनी स्व. शिवाजी कर्डीले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.या प्रसंगी आमदार काशिनाथ दाते, आमदार आशुतोष काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,
“स्व. शिवाजी कर्डीले यांचा लोकसंपर्क अत्यंत दांडगा होता. सरपंच पदापासून आमदार ते मंत्री पदापर्यंतचा प्रवास त्यांनी संघर्षातून केला. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याची अपूरणीय हानी झाली असून, ते सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर झटणारे खरे जननेते होते.”कर्डीले यांच्या कार्यशैलीची आठवण करून देत उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांच्या सामाजिक कार्याला सन्मानपूर्वक आदरांजली अर्पण केली.
