धम्मचक्र प्रवर्तनाचा संदेश देत वर्षावास समारोप सोहळा उत्साहात संपन्न..वंचित बहुजन आघाडी व बौद्ध महासभेचा प्रभावी सहभाग!”
मुंबई (दि.19 ऑक्टोबर 2025):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या धम्ममार्गावर चालत समाजजागृती,समता आणि बंधुभावाचा संदेश देत दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आयोजित वर्षावास समारोप कार्यक्रम दि.१४ ऑक्टोबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप,महिला जिल्हाध्यक्षा शिल्पाताई रणदिवे,नमिताताई भालेराव,युवराज सोनावणे, राजेश भालेराव,मल्लिनाथ सोनकांबळे, संभाजी वाघमारे, संजय गायकवाड, सिद्धांत शेजवळ, रुपेश दिवे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व, आंबेडकरी चळवळीचे योगदान, तसेच समाजातील नवयुवकांनी बुद्धांच्या विचारांवर चालत सामाजिक परिवर्तन घडविण्याचे आवाहन करण्यात आले.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून समानता, शिक्षण आणि संघटन या त्रिसूत्रीवर आधारित समाजरचना घडविण्याचे आवाहन केले.
धम्मदीक्षा, त्रिशरण पंचशील वाचन, बुद्ध वंदना, तसेच सामाजिक बांधिलकी यासंदर्भातील विचारमंथन अशा विविध कार्यक्रमांनी समारोप सोहळ्याला धार्मिक व सामाजिक उर्जा प्राप्त झाली.शेवटी सर्व उपस्थितांना बुद्ध, धम्म आणि संघाच्या मार्गावर एकनिष्ठ राहण्याची शपथ देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
