रुपाली चाकणकर यांच्या असंवेदनशील वक्तव्यावर वादाचा भडका..!वंचित बहुजन महिला आघाडीचा संताप राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून तत्काळ हकालपट्टी करा..!

मुंबई (प्रतिनिधी):-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी डॉ. संपदा मुंडे यांच्या विषयी केलेले वक्तव्य हे असंवेदनशील, स्त्रीविरोधी आणि महिलांचा अपमान करणारे असल्याचा आरोप करत वंचित बहुजन महिला आघाडीकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मुख्य कार्यालयावर आज (गुरुवारी) वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने जोरदार निषेध मोर्चा काढण्यात आला.
महिला आयोगाच्या पदावर असंवेदनशील व्यक्ती अयोग्य!”
या वेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत राज्य सरकार आणि राष्ट्रवादी पक्ष नेतृत्वाविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या.वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते म्हणाल्या “एक महिला नेत्या म्हणून,आणि विशेषतःमहिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना,अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे महिलांच्या सन्मानाचा घोर अवमान आहे.त्यामुळे रुपाली चाकणकर यांची तत्काळ हकालपट्टी व्हायलाच हवी!
निवेदन राष्ट्रवादी कार्यालयात सादर
या निषेध मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्ता आणि राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य उत्कर्षाताई रूपवते,मुंबई प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी,मुंबई प्रदेशच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष शिल्पा रणदिवे,वसई विरार जिल्हा अध्यक्ष गीता जाधव यांनी केले.
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे कार्यालय प्रमुख शिवाजीराव नलावडे यांना निवेदन सादर केले.या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की,रुपाली चाकणकर यांच्या असंवेदनशील वक्तव्यामुळे संपूर्ण महिला वर्गाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर तातडीने कारवाई करून त्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी.
वंचित बहुजन आघाडीचा इशारा,वंचित बहुजन महिला आघाडीच्या नेत्या म्हणाल्या
जर सरकार आणि पक्षाने या प्रकरणात कारवाई केली नाही, तर आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन छेडू.महिलांचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी आम्ही कोणत्याही टप्प्यावर झुकणार नाही.त्याचप्रमाणे,महिलांविषयी असंवेदनशील आणि अपमानकारक भाषा वापरणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
महिला संघटनांचा व्यापक पाठिंबा
या निषेध मोर्चाला मुंबईतील विविध सामाजिक व महिला संघटनांचा मोठा पाठिंबा मिळाला.अनेक कार्यकर्त्या “महिला सन्मान अबाधित ठेवा”, “चाकणकर माफी मागा”, “असंवेदनशील नेत्यांना खुर्चीवर बसू नका” अशा घोषणा देत आंदोलनात सहभागी झाल्या.रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद आता केवळ राजकीय राहिलेला नाही,तर महिला सन्मानाचा प्रश्न बनला आहे.वंचित बहुजन महिला आघाडीच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्य सरकारवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)वर दबाव वाढला आहे.आता प्रशासन आणि पक्ष नेतृत्व या प्रकरणात कोणते पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
