धाडसी चोरी..पहाटेच्या अंधारात बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडून तब्बल १९ लाख ६२ हजार रुपये घेऊन पसार
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या राळेगणसिद्धी गावात धाडसी चोरट्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमवरच हात साफ करत पोलिसांनाही चकमा दिला आहे. पहाटेच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून तब्बल १९ लाख ६२ हजार रुपयांची रोख रक्कम लांबवली.हा प्रकार ५ नोव्हेंबर रोजी पहाटे साधारण तीन वाजण्याच्या सुमारास घडला असून संपूर्ण परिसरात यामुळे एकच खळबळ उडाली आहे.या संदर्भात बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे व्यवस्थापक किरण नारायण आवारी (वय ३३,रा. रांधे,ता.पारनेर) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.राळेगणसिद्धी गावातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेबाहेरील एटीएम मशीन हे चोरट्यांच्या निशाण्यावर होते.पहाटे एका चारचाकी वाहनातून चार चोरटे आले आणि गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन उघडून त्यातील चार बॉक्सपैकी दोन बॉक्समधील रक्कम चोरून नेली.
प्राथमिक तपासानुसार, चोरट्यांनी एटीएमच्या बाहेरील कॅमेरे निष्क्रिय करण्याचाही प्रयत्न केला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.घटनेची माहिती मिळताच रात्रगस्त घालणारे पोलीस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत चोरट्यांनी पळ काढला होता.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांनी एटीएम केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची मागणी केली आहे.
