मुंबईत मंत्रालयासमोर रूपाली चाकरणकरां विरोधात वंचितचा मोर्चा आंदोलन दडपण्यासाठी पोलीस बळाचा वापर,महिला आघाडीच्या अध्यक्षा जखमी
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेल्या स्त्रीविरोधी विधानाचे तीव्र पडसाद मुंबईत उमटले.रूपाली चाकणकरांच्या विधानाच्या निषेधार्थ वंचित बहुजन महिला आघाडीने मुंबईत मंत्रालयासमोर आंदोलन केले.यावेळी मोर्चा दरम्यान पोलीस आणि वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनकर्त्या महिला कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाली. या घटनेत मुंबई प्रदेश अध्यक्षांसह इतर नेत्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे.यावरून वंचित बहुजन आघाडीने राज्य सरकारवर दडपशाहीचा आरोप करत तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलेले विधान स्त्रीविरोधी आणि अत्यंत लज्जास्पद असल्याचा आरोप करत वंचित बहुजन महिला आघाडीने मुंबईत मंत्रालयासमोर जोरदार आंदोलन केले. महिलांवरील अन्याय, अत्याचारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.आंदोलनादरम्यान पोलिस आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.यावेळी झालेल्या संघर्षात वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा स्नेहल सोहनी या पोलिसांच्या धक्काबुक्कीत जखमी झाल्या आहेत.तसेच राज्य प्रवक्त्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या उत्कर्षा रुपवते तसेच नवी मुंबई अध्यक्षा शिल्पा रणदिवे यांना ही पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचे वृत्त आहे.या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेत प्रमुख मागण्या केल्या आहेत. रूपाली चाकणकर यांनी केलेल्या स्त्रीविरोधी विधानाबद्दल त्यांना त्वरित महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून दूर करण्यात यावे,आंदोलक महिला कार्यकर्त्यांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलिसांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी.अशा मागण्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीन करण्यात आल्या आहेत.सदरच्या घटनेनंतर तीव्र स्वरूपाच्या भावना राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या उत्कर्षा रुपवते यांच्या सह यांनी महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
