पतीचा अपहरणाचा बनाव रचून निरापराधांना अडकवणाऱ्या ‘पत्नीसह सासू सासऱ्यांसह पाच जणां’वर गुन्हा दाखल..अहिल्यानगरात धक्कादायक प्रकार उघड
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगर तालुका परिसरात भलत्याच व्यक्तींना गंभीर गुन्ह्यात अडकवण्यासाठी स्वतःच्या पतीच्या अपहरणाचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या खोट्या नाट्यप्रकरणी खुद्द ‘अपहृत’ पतीसह त्याची पत्नी,वडील, सासू आणि सासरे अशा एकूण पाच जणांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे या प्रकरणी फिर्याद खुद्द पोलिसांनीच दाखल केली आहे.
२५ ऑक्टोबर रोजी हातवळण (ता. अहिल्यानगर) येथील तुकाराम महादेव यादव याचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाली होती.मात्र तपासाच्या दरम्यान पोलिसांना या घटनेत काहीतरी वेगळं असल्याचा संशय आला. तपास वाढवला असता, पोलिसांनी केलेल्या चौकशीत आश्चर्यकारक बाब उघडकीस आली तुकाराम यादवचे अपहरण झालेच नव्हते! त्यानेच स्वतःचा अपहरणाचा खोटा बनाव रचला होता.या कटात त्याची पत्नी सुमन तुकाराम यादव,वडील महादेव सावळेराम यादव,तसेच सासरे रामदास उध्दव सोनसाळे आणि सासू सिंधुबाई रामदास सोनसाळे (रा.शेंडी) यांनी त्याला साथ दिली. सर्वांनी संगनमत करून तुकाराम याला लपून राहण्यास मदत केली आणि पोलिसांना चुकीच्या दिशेने फिरवण्याचा प्रयत्न केला.एवढ्यावर न थांबता,सुमन यादव हिने पोलीस ठाण्यात वाढीव तक्रार दाखल करत गणेश कवडे,माऊली पठारे,सुनिल दिलीप पठारे व अक्षय भंडारे (सर्व रा.बनपिंप्री,ता.श्रीगोंदा) यांच्यावर खोटे आरोप केले.या चौघांवर कठोर कारवाई व्हावी, त्यांना अटक व्हावी व त्यांचे नुकसान व्हावे,या उद्देशानेच हा खोटा कट रचण्यात आला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.अखेरीस हा संपूर्ण प्रकार उघड झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक भरत बाजीराव धुमाळ यांनी स्वतः फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी तुकाराम यादव,सुमन यादव,महादेव यादव, रामदास सोनसाळे आणि सिंधुबाई सोनसाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
