महिलांच्या न्याय हक्कासाठी मैदानात उतरल्या स्वातीताई धाईंजे..नवीन संघटनेतून करणार महिला सक्षमीकरणाचा नवा संकल्प.
अकलूज (प्रतिनिधी):-महिलांच्या न्याय,हक्क आणि सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या स्वातीताई धाईंजे या सोलापूर जिल्ह्यात सामाजिक कार्याच्या नव्या पर्वाला लवकरच सुरुवात करणार आहे.कोणत्याही राजकीय पक्षाशी आता संबंध न ठेवता,त्या स्वतःची नवीन संघटना सहकाऱ्यांच्या पाठिंब्यावर उभी करत आहेत.या संघटनेच्या माध्यमातून समाजातील वंचित,अत्याचारग्रस्त आणि दुर्लक्षित महिलांना न्याय मिळवून देणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखविणे हा त्यांचा मुख्य संकल्प आहे.
स्वातीताई धाईंजे यांनी अनेक वर्षांपासून समाजकार्याच्या माध्यमातून महिलांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.घरगुती हिंसा,लैंगिक छळ,दहेज प्रथा,मुलींचे शिक्षण, रोजगार या विषयांवर त्यांनी नेहमीच निर्भीडपणे आवाज उठविला आहे.समाजातील खालच्या स्तरातील महिलांपासून ते शिक्षित वर्गापर्यंत सर्वांना समान हक्क मिळावेत,यासाठी त्यांनी सातत्याने आंदोलनाची भूमिका घेतली.त्यांच्या नव्या संघटनेचे नाव अद्याप जाहीर झाले नसले तरी लवकरच ‘महिला सक्षमीकरणाची नवी दिशा’ या घोषवाक्याखाली राज्यभर कार्य सुरू करण्यात येणार आहे. “महिलांच्या प्रश्नांवर फक्त बोलण्यापेक्षा कृतीची वेळ आली आहे,” असे स्पष्टपणे सांगत स्वातीताई यांनी महिला सक्षमीकरणाचा नवा संकल्प घेतला.स्वातीताईंचे म्हणणे आहे की “महिलांना राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात समान हक्क मिळवून देणे ही फक्त लढाई नाही,ती एक जबाबदारी आहे.कोणत्याही पक्षाच्या छत्राखाली नव्हे,तर स्वबळावर महिलांचा आवाज बुलंद करणार आहोत.”महिलांच्या हक्कासाठी झटणाऱ्या या आंदोलनात अनेक तरुणी, सामाजिक कार्यकर्त्या आणि ग्रामस्तरीय महिला सहभागी होणार आहेत स्वातीताईंच्या नेतृत्वाखाली सुरू होणाऱ्या या नव्या संघटनेमुळे जिल्हा तसेच राज्यातील महिला चळवळींना नवी दिशा मिळेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
