तहसील मधील डंपर चोरी प्रकरणी तिघे आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-राहुरी तालुक्यातील तहसिल परिसरातून चोरीला गेलेला ९ लाख रुपये किमतीचा डंपर अवघ्या दोन दिवसांत शोधून काढत स्थानिक गुन्हे शाखेने तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली.प्राप्त माहितीनुसार,दि.५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास राहुरी तहसिल परिसरात उभा असलेला विनानंबरचा पांढऱ्या-करड्या रंगाचा डंपर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता.या प्रकरणी डंपर मालक प्रशांत सयाजी औटी (वय ३७,रा.राहुरी) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.प्रकरण गंभीर असल्याने0पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांना तातडीने या गुन्ह्याचा तपास करून आरोपींना शोधून काढण्याचे आदेश दिले.
यानुसार निरीक्षक कबाडी यांनी पोलीस अंमलदार दिपक घाटकर, फुरकान शेख,भिमराज खर्से, भगवान थोरात,विशाल तनपुरे, प्रशांत राठोड आणि महिला अंमलदार सुर्वणा गोडसे यांच्या समावेशाने विशेष पथक तयार केले.पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे ७ नोव्हेंबर २०२५ रोजी नगर तालुक्यातील डोंगरगण रोडवरील पिंपळगाव तलावा जवळील परिसरात शोध मोहीम राबवली. तेथे संशयित डंपर उभा असून तीन इसम त्याच्याजवळ असल्याचे दिसून आले.चौकशीत या तिघांची ओळख पटली
1️⃣ भगवान गोवर्धन कल्हापुरे (वय 38, रा. खडांबे खुर्द, ता. राहुरी)
2️⃣ सोमनाथ नामदेव ठाणगे (वय 31, रा. देहरे, ता. अहिल्यानगर)
3️⃣ अविनाश भिकन विधाते (वय 29, रा. ताहाराबाद, ता. राहुरी)
चौकशीत आरोपींनी कबुली दिली की,भगवान कल्हापुरे यांच्या सांगण्यावरून सोमनाथ ठाणगे आणि अविनाश विधाते यांनी हा डंपर राहुरी परिसरातून चोरला होता.पोलिसांनी त्यांच्याकडून ९ लाख रुपयांचा विनानंबर डंपर जप्त केला आहे.तिघा आरोपींना राहुरी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले असून,पुढील तपास राहुरी पोलिस करत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
