प्रभाग क्रमांक २ मधून विवेक जाधव रणांगणात..प्रभागात पेन्शन योजना,कन्यादान उपक्रम आणि बालाजी मंदिर उभारणीचा भव्य संकल्प..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मधून सामाजिक कार्यात सदैव आघाडीवर असलेले सामान्य कुटुंबातील व सामाजिक कार्यकर्ते विवेक चंद्रकांत जाधव हे उमेदवारीसाठी सज्ज झाले आहेत.त्यांच्या उमेदवारीमुळे परिसरात नवीन राजकीय समीकरणे तयार होत असून नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
जाधव यांनी आपल्या निवडणूक तयारी दरम्यान प्रभागातील नागरिकांसाठी काही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या आहेत.५० वर्षांवरील महिला व पुरुष नागरिकांसाठी दरमहा तीनशे रुपयांची पेन्शन योजना राबविण्याचा त्यांचा मानस आहे.या योजनेमुळे वरिष्ठ नागरिकांना आरोग्यासाठी आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच,प्रभागातील कन्यांच्या विवाह प्रसंगी संसारोपयोगी वस्तू कन्यादान म्हणून भेट देण्याचा उपक्रमही जाधव राबविणार आहेत.समाजातील प्रत्येक कुटुंबाला आधार देण्याचा त्यांचा संकल्प असून “कन्यादान” या उपक्रमातून गरजू मुलींच्या विवाहात आर्थिक मदत मिळणार आहे.याशिवाय, धार्मिक भावनेला बळ देण्यासाठी प्रभागात तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर भव्य बालाजी मंदिर उभारण्याची जाधव यांची घोषणा नागरिकांत चर्चेचा विषय ठरत आहे.
धार्मिक,सामाजिक आणि सेवाभावी कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले विवेक जाधव यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने प्रभाग क्रमांक दोन मध्ये राजकीय चुरस वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.नागरिकांच्या हितासाठी ठोस योजना,सेवाभाव आणि विकासाच्या ध्येयाने काम करण्याची प्रतिज्ञा घेत विवेक जाधव यांनी आपली निवडणूक मोहीम सुरू केली आहे.
