🗳️महानगरपालिकेच्या मतदारयादीचे काम फक्त पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडेच..अफवांवर विश्वास ठेऊ नका अशी खोटी माहिती पसरवल्यास कारवाईचा इशारा!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी तयार करण्याचे काम महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या अधिकृत कर्मचाऱ्यांकडूनच सुरू आहे, अशी स्पष्ट माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे.शहरातील समाजमाध्यमांवर काही जणांकडून “मतदारयादीचे काम राजकीय पदाधिकाऱ्यांकडे दिले आहे” असा खोटा प्रचार केला जात असल्याचे लक्षात आले असून, हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.महानगरपालिकेला विधानसभेची १ जुलै २०२५ रोजीची मूळ मतदारयादीची सॉफ्ट कॉपी उपलब्ध करून देण्यात आली होती.या यादीची प्रिंट केवळ खाजगी झेरॉक्स सेंटरमार्फत काढण्यात आली असून,त्या व्यतिरिक्त कोणत्याही बाहेरील व्यक्तीला अथवा राजकीय कार्यकर्त्याला मतदारयादीचे काम देण्यात आलेले नाही, असे त्यांनी सांगितले.
पालिकेचे कर्मचारीच प्रत्यक्ष स्थळपाहणी करून प्रभागनिहाय मतदार याद्या फोडण्याचे आणि कंट्रोल चार्ट भरण्याचे काम करत आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमधून प्रारूप मतदारयाद्या तयार होतील. या प्रारूप याद्या १४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जाऊन नागरिकांकडून हरकती मागवण्यात येणार आहेत.याच संदर्भात,चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्या नितीन भुतारे यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आयुक्त डांगे यांनी सांगितले.नागरिकांनी समाजमाध्यमांवरील अफवा व खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवता अधिकृत स्रोतांवरूनच माहिती घ्यावी,असे आवाहन त्यांनी केले आहे.तसेच माध्यमांना देखील जबाबदारीने वागून, निवडणुकीसंबंधित कोणतीही बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी अधिकृत पडताळणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
