जुना मोंढा परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात..! रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाची महापालिकेकडे तातडीची मागणी फुटलेल्या ड्रेनेज पाईपलाईन दुरुस्तीसाठी मनपाची तात्काळ हालचाल..
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-छत्रपती संभाजीनगर येथील जुना मोंढा झोन क्रमांक ३ ते शिवसेना कमान या परिसरात ड्रेनेज पाईपलाईन फुटल्याने संपूर्ण भागात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने ११ नोव्हेंबर २०२५ रोजी महानगरपालिका जलप्रदाय व ड्रेनेज विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल तनपुरे साहेब यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनाद्वारे पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिनेश गवळे यांनी जुन्या पाईपलाईनच्या फुटलेल्या भागामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक धोक्यांबद्दल सविस्तर चर्चा करत, नवीन ड्रेनेज पाईपलाईन बसविण्याची मागणी केली.
या निवेदनाची गंभीर दखल घेत अभियंता तनपुरे साहेब यांनी तत्काळ संबंधित कर्मचाऱ्यांना आदेश देऊन जागेची पाहणी केली. तसेच, नवीन ड्रेनेज पाईपलाईनसाठी इस्टिमेट तयार करण्याचे काम सुरू करून लवकरात लवकर पाईपलाईनचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, रिपब्लिकन पार्टीच्या पुढाकाराचे कौतुक व्यक्त केले जात आहे.निवेदनावेळी पक्षाचे मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती, शहर उपाध्यक्ष अनिस गंगापूरकर, शहर संघटक रमजानी शहा, पूर्व शहराध्यक्ष बाबर खान, भवानीनगर विभागप्रमुख कलीम खान, तसेच बबलू शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
