चॅप्टर केसमध्ये १६ जणांना जेल प्रवास पोलीस प्रशासनाचे कठोर पावले आणि गुन्हेगारीला लगाम..कोणत्या पोलीस ठाण्यातून किती आरोपी वाचा..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाने मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे.विविध पोलीस ठाण्यांतील एकूण १६ गुन्हेगारांना चॅप्टर केसेस अंतर्गत थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार (क्रमांक पीआरओ-0624/प्र.क्र.31/विशा-2, दिनांक 28/06/2024) अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर यांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांच्या पुढे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 126 ते 129 आणि 163 अंतर्गत चॅप्टर केसेसची सुनावणी,बंधपत्र घेणे, उल्लंघनाची कारवाई,जामीनदार स्वीकारणे-नाकारणे अशा सर्व प्रक्रिया पार पडतात.अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ५ पेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या व्यक्तींना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर कलम 129 नुसार सादर करण्याचे आदेश दिले होते.त्याअनुषंगाने श्री.जयदत्त भवर (उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर),श्री.कुणाल सोनवणे (उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर),श्री.अमोल भारती (उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी) यांनी आपापल्या विभागातील सराईतांवर कारवाई करत पोलीस स्टेशन मार्फत चॅप्टर केसेसचे प्रस्ताव कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे पाठवले.सुनावणी अंती १६ जणांना न्यायालयीन कोठडी..कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी सुनावणीदरम्यान आरोपितांच्या वर्तनाचा,बंधपत्र उल्लंघनाचा व जामीनदार न सादर करण्याच्या बाबींचा तपास करून थेट न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला.

कोणत्या पोलीस ठाण्यातून किती आरोपी?
1)श्रीरामपूर शहर 5
2 )संगमनेर शहर 3
3 )कोपरगाव शहर 3
4 )लोणी 3
5 )राहुरी 2
एकूण 16
बंधपत्राचे उल्लंघन आणि नवीन गुन्हे,अनेक प्रतिवादींनी चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र करूनही जामीनदार हजर केले नाही,काहींनी बंधपत्राच्या कालावधीत पुन्हा नवीन गुन्हे केले.ज्यामुळे त्यांनी बंधपत्राचा भंग केला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे १६ जणांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आले.या कारवाईमुळे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून निवडणूक काळात कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाचा हा कडक निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.
