२४ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश..खून प्रकरणातील मुख्य आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कर्जत तालुक्यातील खांडवी येथे घडलेल्या धक्कादायक खून प्रकरणातील मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासांत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.फिर्यादी शुभम प्रल्हाद साळवे यांच्या माहितीनुसार त्यांचे वडील प्रल्हाद सोनाजी साळवे हे 12 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयात कामासाठी गेल्यानंतर घरी परतले नव्हते.14 नोव्हेंबर रोजी त्यांचा मृतदेह खांडवी शिवारातील इरिगेशनच्या पत्र्याच्या खोलीत आढळून आला.सदर प्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 3(5) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या खून प्रकरणात आरोपी जमली उर्फ संध्या भोसलेला यापूर्वीच अटक करण्यात आली होती,तर तिचा भाऊ धन्या उर्फ धनंजय काळे हा मुख्य आरोपी गुन्ह्यानंतर फरार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी तात्काळ पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.पोलीस पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे श्रीगोंदा परिसरात सापळा रचून धन्या उर्फ धनंजय काळे (वय 19) याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने धक्कादायक कबुली दिली.त्याची बहीण जमली उर्फ संध्या भोसले आणि मयत प्रल्हाद साळवे यांच्यात विवाहबाह्य संबंध होते. पैशांच्या वादातून संतापाच्या भरात दोघांनी मिळून प्रल्हाद साळवे यांचा खून केल्याचे आरोपीने कबूल केले.ताब्यात घेतलेला आरोपी धनंजय काळे याला मिरजगाव पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 246/2025 मध्ये हस्तांतरित करून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी त्यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग,पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे,गणेश लबडे,हृदय घोडके,लक्ष्मण खोकले,फुरकान शेख,भीमराज खरसे,श्याम जाधव,भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर,बाळासाहेब गुंजाळ, प्रकाश मांडगे,अमोल आजबे, मनोज साखरे,प्रशांत राठोड, महादेव भांड यांनी केली आहे.
