देवगड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साकारला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा भारताचा नकाशा..संविधानिक मूल्य,राष्ट्रीय एकात्मता बळकट करणारा अनोखा उपक्रम साजरा
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):- हिवरगाव पावसा येथील देवगड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत संविधान दिना निमित्त भारताचा भव्य नकाशा तयार केला.संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी देशभक्तीने ओथंबलेला,प्रेरणादायी आणि लक्षवेधी उपक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.शाळेच्या विस्तीर्ण मैदानावर शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत भारताचा भव्य नकाशा तयार केला.या नकाशामध्ये तिरंग्याचे तीन रंग केशरी,पांढरा आणि हिरवा सुंदररित्या साकारून मधोमध अशोक चक्राची प्रतिकृती रेखाटण्यात आली होती.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधान विषयक जाणीव,राष्ट्रप्रेम आणि कर्तव्य निष्ठेचे महत्त्व अधोरेखित झाले.भारतीय संविधानिक मूल्यांचा आदर व पालन करण्याचा संदेश यातून देण्यात आला.विद्यार्थ्यांनी संविधान प्रास्ताविकाचे वाचन केले व घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या विशेष कार्यक्रमाचे नियोजन आणि नेतृत्व मुख्याध्यापिका श्रीम.उगले सुनंदा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.मुख्याध्यापिका उगले यांनी संविधानाचे महत्त्व समजावून सांगत देशाचे भविष्य घडवण्यात युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला समता,बंधुता, न्याय,स्वतंत्र या तत्त्वावर आधारित संविधान दिले आहे.संविधानाने आपले हक्क,अधिकार,कर्तव्य सुरक्षित केलेले आहेत.संविधानामुळे आपला देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे.देवगड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा भव्य नकाशा साकारला आहे.हा उपक्रम केवळ एक उपक्रम न राहता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्ती, एकता आणि संविधानाचे महत्त्व रुजवणारा प्रेरणास्रोत ठरला आहे.या नकाश्याचे सुंदर आणि भव्य हवाई चित्रीकरण करण्यासाठी सुयश नेहे,विशाल शिरसाठ आणि साहिल गोफणे यांनी शाळेसाठी आधुनिक ड्रोन कॅमेरा उपलब्ध करून दिला.त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचू शकला.उपस्थित सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक व ग्रामस्थांनी हा उपक्रम पाहून समाधान व्यक्त केले.तर सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
