भिमराज सेनेच्या महाराष्ट्र प्रमुख जयाताई बनसोडे यांना ‘प्रेरणा पुरस्कार’ प्रदान..समाज उभारणीतील कार्याला मोठा मान..!
मुंबई (प्रतिनिधी):- सामाजिक परिवर्तन,बहुजन समाजाचे सशक्तीकरण आणि संघटन बांधणीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या भिमराज सेना महाराष्ट्र प्रमुख जयाताई बनसोडे यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याचा गौरव म्हणून लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या वतीने ‘प्रेरणा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.हा मानाचा पुरस्कार राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांच्या शुभहस्ते मुंबई येथे देण्यात आला.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,युवा कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.समाजातील वंचित,उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी जयाताई बनसोडे यांनी केलेल्या धडाडीच्या कामाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्रात भिमराज सेनेचे कार्य अधिक प्रभावीपणे विस्तारले असून, युवकांमध्ये सामाजिक जागृती वाढण्यास मोठी मदत झाली आहे.पुरस्कार स्वीकृत करताना जयाताई बनसोडे यांनी सांगितले की, “हा पुरस्कार माझा नसून समाजातील प्रत्येक बांधवाचा असून मला मिळणारी ही प्रेरणा पुढील काळात अधिक जोमाने लढण्यासाठी बळ देणारी आहे.समाजहितासाठी सातत्यानं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान होणे ही काळाची गरज असल्याचे मतही मान्यवरांनी व्यक्त केले.या पुरस्कारामुळे सामाजिक चळवळींना नवी उर्जा मिळेल,असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
