अहिल्यानगरचा चमकता तारा..! देवाशीष घोडके मुंबई स्टेट संघाचा कर्णधारपदी
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आयोजित विजय मार्चंट ट्रॉफी स्पर्धेसाठी मुंबई स्टेट U-16 संघाची घोषणा करण्यात आली असून,अहिल्यानगरचा उदयोन्मुख क्रिकेटपटू देवाशीष संदीप घोडके याची कर्णधारपदी निवड झाली आहे.मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याच्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवून एक मोठा सन्मान दिला आहे.
देवाशीष घोडके हा पूर्वी भारतीय संघाच्या सलामीचा फलंदाज अर्जुन्य राहणे यानंतरचा अहिल्यानगरचा दुसरा खेळाडू आहे,ज्याची मुंबई स्टेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. त्याच्या सातत्यपूर्ण खेळी,उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य आणि नेतृत्वक्षमतेमुळे तो या जबाबदारीस पात्र ठरला.विजय मार्चंट ट्रॉफीचे सामने ७ ते २९ डिसेंबर दरम्यान कटक, ओडिशा येथे होणार आहेत.या सामन्यांमध्ये मुंबईचा सामना झारखंड,आसाम,केरळ,मणिपूर आणि बंगाल या संघांशी होणार आहे.अहिल्यानगरच्या देवाशीषकडून शानदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
