निंबळक–इसळक परिसरात बिबट्याचा दहशत कायम..स्नेहालयच्या ४०० अनाथ बालक-महिलांच्या जीविताला गंभीर धोका..बिबट्या फिरतोय आणि प्रशासन झोपलंय
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-निंबळक–इसळक परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्याच्या वाढत्या उपस्थितीने भीतीचे सावट दाटले आहे.नागरिक,शेतकरी, महिला–बालके आणि विशेषतः स्नेहालय सारख्या संवेदनशील संस्थेतील रहिवासी अतिशय असुरक्षित परिस्थितीत दिवस काढत आहेत.वारंवार दर्शन, पाऊलखुणा,प्रत्यक्ष हल्ले या घटनांनंतरही वनविभागाच्या निष्क्रिय भूमिकेवर संताप ओसंडून वाहत आहे.
४० वर्षे समाजसेवा, पण आज जीवितास मोठा धोका!
45 एकरांवर पसरलेल्या स्नेहालय संस्थेने मागील चार दशकांत अनाथ,एचआयव्ही बाधित महिला, उपेक्षित बालके, तसेच रस्त्यावरून उचललेल्या मानसिक रुग्णांना जगण्याचा आधार दिला आहे.या परिसरात रोज 300–400 लोकांचे वास्तव्य असल्याने बिबट्या हल्ल्याचा धोका शेकडो पट वाढलेला आहे.
स्नेहालयचे महत्त्वाचे प्रकल्प
पाणी फाउंडेशनचे 6 एकर डेमो प्लॉट – भाजीपाला, मका, गोड ज्वारी प्रात्यक्षिके; शेतकऱ्यांचे नियमित प्रशिक्षण,स्नेहस्पर्श बालगृह – 140 बालकांचे संगोपन,मानसग्राम – 80 मानसिक रुग्णांचे पुनर्वसन,महिला पुनर्वसन केंद्र – एचआयव्ही बाधित व निराधार महिलांचा आधार अशा संवेदनशील ठिकाणी बिबट्याचा वावर हा गंभीर संकटाचा इशारा आहे.
८ वर्षीय मुलावर बिबट्याचा रक्तथरकाप हल्ला!
निंबळक येथील कोतकर वस्तीतील राजवीर (वय ८) या चिमुकल्यावर बिबट्याने अचानक झडप घालत जीवघेणा हल्ला केला. मुलाने आरडाओरड केल्याने प्राण वाचला,परंतु तो गंभीर जखमी झाला.ही घटना स्नेहालयच्या अगदी जवळ घडल्याने महिलां-बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न आणखी गंभीर बनला आहे.
वनविभागाची धक्कादायक बेफिकिरी
“फोटो काढून पाठवा”, “बोकड तुम्ही आणा!”**
स्नेहालयचे रमाकांत दोड्डी,चंद्रकांत शेंबडे, मीरेन गायकवाड यांनी वन विभागाला वारंवार फोन, संदेश आणि लेखी तक्रार दिली.मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार प्रतिसाद असा
फोन लागतच नाही,उत्तर: “फोटो काढून पाठवा, मग कारवाई करू”,पिंजरा लावण्यास सांगितले, पण अट “बोकड, कोंबडा तुमच्या पैशाने आणा!”बिबट्याच्या प्रत्यक्ष धोका असूनही शोधमोहीम, पिंजरे, ड्रोन, गस्त—कसलीही यंत्रणा तैनात नाही.
स्थानिक नागरिक संतापून म्हणतात—
“अजून एखादी दुर्घटना घडली तर त्यास वन अधिकाऱ्यांचीच जबाबदारी!”
परिस्थिती भयावह — अंधारानंतर हालचालच बंद
बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील सामान्य जीवन विस्कळीत झाला आहे.शेतकरी रात्री शेतात जाणे थांबले,बालकांचे खेळणे, फिरणे बंद,स्नेहालयातील मानसिक रुग्णांना सतत धोक्याची भीती,प्रशिक्षणासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मोठी घबराट,स्नेहालयसारख्या मानवी सेवाकार्यात अग्रणी संस्थेजवळ असा वन्यजीवांचा वावर अत्यंत धोकादायक मानला जात आहे.
स्थानिकांची ठोस मागणी — तातडीची कारवाई हवीच!
1. प्रशिक्षित पथकासह त्वरित पिंजरे लावावेत
2. थर्मल ड्रोनद्वारे रात्री निरीक्षण
3. स्नेहालय परिसर विशेष संरक्षित क्षेत्र घोषित करावा
4. निष्काळजी अधिकाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंग कारवाई
5. फेन्सिंग, प्रकाशयोजना, CCTV, सेन्सर, रात्रीची गस्त यांसारख्या स्थायी उपाययोजना
स्नेहालयचे इशारा — “आता दुर्लक्ष चालणार नाही!”
स्नेहालयाचे पालक मिलिंद कुलकर्णी यांनी स्पष्ट इशारा दिला
“महिला, मुले आणि रुग्णांच्या सुरक्षेला प्राधान्य न दिल्यास कधीही मोठी शोकांतिका घडू शकते. प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई करावी; अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”
संस्थेच्या अध्यक्षा जयाताई जोगदंड यांनीही चिंता व्यक्त करत म्हटले—
“हा फक्त वन्यजीवांचा प्रश्न नाही, तर मानवजीवनाच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर सामाजिक प्रश्न आहे. अजून उशीर केला तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल.”
लोकांच्या मनातील प्रश्न कायम —
“बिबट्या फिरतोय… आणि प्रशासन झोपलंय?”**
हनिफ शेख स्नेहालय
मो. 9011020177
