६ डिसेंबरला ‘स्वर झंकार संगीत महोत्सव’ नाही चालणार..रिपब्लिकन पार्टीचा इशारा तारीख बदला नाहीतर महोत्सव उधळून टाकू..!
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या (६ डिसेंबर) या पावन दिनी ‘स्वर झंकार संगीत महोत्सव’ आयोजित करू नये,असा तीव्र इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रने आयोजकांना दिला आहे.एमआयटी महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये ६ डिसेंबरला हा महोत्सव होणार असल्याची माहिती मिळताच पक्षाने हा कार्यक्रम ‘भावनांचा अनादर’ असल्याचे सांगत तात्काळ विरोध दर्शविला.रिपब्लिकन पार्टीचे म्हणणे आहे की,६ डिसेंबर हा राष्ट्रीय शोकाचा दिवस आहे.या दिवशी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा अपमान आहे. आयोजकांनी जनभावनांचा आदर करून कार्यक्रम तात्काळ अन्य दिवशी हलवावा.
याबाबत पक्षाने सातारा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक शिंदे यांना निवेदनही दिले आहे.तसेच स्पष्ट शब्दांत इशारा देत म्हटले “जर आयोजकांनी तारीख न बदलता महोत्सव ६ डिसेंबरलाच घेतला,तर रिपब्लिकन पार्टी तीव्र आंदोलन करून कार्यक्रम उधळून लावेल.या निवेदनावेळी जिल्हाप्रमुख दिनेश गवळे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती, शहराध्यक्ष रणजीत मनोरे, जेष्ठ नेते प्रकाश घोरपडे, प्रदीप धनेधर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
