वर्धा प्रतिनिधी (सागर झोरे):- वर्धा येथील उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यासह येळाकेळीच्या स्वस्त धान्य दुकानदाराला २० हजार रुपयांची लाच घेताना गुरुवारी दि.१६ फेब्रुवारी रोजी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.विजय कृष्णराव सहारे(वय५०) असे त्या लाचखोर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचे तर ऋषिकेश रमेशराव ढोडरे(वय४३) असे त्या लाचप्रकरणी अटक झालेल्या स्वस्त धान्य दुकानदाराचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार स्वस्त धान्य दुकानदारांना शासनाकडून मिळणाऱ्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या धान्य पुरवठ्यासाठी कायदेशीर कमिशन मिळते.परंतु याकरिता जिल्हापुरवठा अधिकारी स्वस्त धान्य दुकानदारांकडून आपल्या दलालामार्फत मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल करतात.सेलू तालुक्यातील तक्रारदार तथा स्वस्त धान्य दुकानदार यांची सेलू तालुक्यात दोन स्वस्त धान्याची दुकाने आहेत.त्यांचे सदरचे कमिशन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी अडवून ठेवले होते, यासोबतच त्यांच्याकडील सात महिन्यांचा थकीत हप्ता असे एकूण ५० हजार रुपये लागतील,अशी तंबी दुकानदाराला देण्यात आली होती परंतु दुकानदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नागपूर यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी काल सापळा रचून कारवाई केली असता जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासाठी दलाली करणारा येळाकेळी येथील स्वस्त धान्य दुकानदार ऋषिकेश ढोडरे यांच्या मार्फत वर्धा येथील विश्रामगृहात २० हजारांची लाच घेताना दोघांनाही रंगेहाथ अटक करण्यात आली.यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला घटनास्थळी वेगवेगळ्या बंद लिफाफ्यात ५ लाख ६० हजार ३६० रुपये मिळून आले.स्वस्त धान्य दुकानदार जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासाठी दलाली करीत असल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.सदर कारवाई नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.
