प्रभाग ३ मध्ये ‘आप’चा पहिला झेंडा..! शितल कांडेलकर यांचा नामांकन फॉर्म सर्वात आधी दाखल..विशेष..नामांकन फॉर्म अधिकाऱ्यांकडून कौतुकास्पद ठरला
पुणे (प्रतिनिधी):-आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मध्ये आम आदमी पार्टीने निवडणूक रणशिंग फुंकत पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पाडला आहे.आम आदमी पार्टीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती शितल विश्वनाथ कांडेलकर यांनी प्रभाग क्रमांक ३ (विमान नगर–लोहगाव–वाघोली) OBC महिला गट (अ) मधून सर्वात पहिला नामांकन अर्ज दाखल करून निवडणूक प्रक्रियेला वेगळी दिशा दिली आहे.
निवडणुकीसाठीचा नामांकन फॉर्म स्वतःच्या घरी शांत आणि नियोजनबद्ध पद्धतीने भरल्याचा आनंददायी अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.फॉर्म भरण्याची पद्धत,माहितीतील अचूकता, रकान्यांतील सुस्पष्ट नोंदी तसेच घोषणापत्रांचा योग्य क्रम यामुळे एकही चूक नसलेला त्रुटीविरहित अर्ज सादर झाला.नगर रोड क्षेत्रीय कार्यालयातील निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांनी देखील या नामांकन फॉर्मचे विशेष कौतुक केले. “फॉर्म जसा विकत घेतला तसाच स्वच्छ,हाताने नीटनेटका भरलेला असल्यामुळे तपासणी अतिशय सोपी झाली. अशा प्रकारे अर्ज भरला तर चुका होण्याची शक्यता राहत नाही,” असे मत अधिकाऱ्यांनी इतर उमेदवारांनाही आवर्जून सांगितले.
नामांकन प्रक्रियेबाबत बोलताना श्रीमती कांडेलकर म्हणाल्या, “कोणतेही काम कठीण नसते. फक्त मनापासून,न घाबरता आणि नीट नियोजन करून केल्यास प्रत्येक गोष्ट सोपी आणि सुकर होते.निवडणूक प्रक्रियेतही पारदर्शकता आणि शिस्त महत्त्वाची आहे.”प्रभाग क्रमांक ३ मध्ये आम आदमी पार्टीचा हा पहिला नामांकन अर्ज असल्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी निवडणुकीत स्वच्छ राजकारण,नियोजनबद्ध कामकाज आणि जनतेशी थेट संवाद या मुद्द्यांवर आम आदमी पार्टी ठामपणे उभी राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
