शिंदे गटाला मोठा धक्का..!माजी महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई ताठे यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
नाशिक (प्रतिनिधी):-राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना शिंदे गटाला मोठा धक्का देणारी घटना समोर आली आहे.येथील शिंदे गटाच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई ताठे यांनी शिंदे गटाला रामराम ठोकत वंचित बहुजन आघाडीमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे.त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाकडे महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.वंचित बहुजन आघाडीच्या व्यासपीठावर झालेल्या कार्यक्रमात लक्ष्मीताई ताठे यांनी पक्षप्रवेश करताना आपली भूमिका स्पष्ट केली. “सामान्य जनतेचे प्रश्न,महिलांचे हक्क, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांचा आवाज प्रभावीपणे मांडणारा पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीने मला आकर्षित केले,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.लक्ष्मीताई ताठे यांनी शिंदे गटात महिला जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना संघटनात्मक बांधणी,महिला कार्यकर्त्यांचे प्रश्न,सामाजिक उपक्रम आणि स्थानिक पातळीवरील आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता. त्यांच्या अनुभवाचा व जनसंपर्काचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.या प्रवेशावेळी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी लक्ष्मीताई ताठे यांचे स्वागत करत, “हा प्रवेश केवळ एका नेत्याचा नसून जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या एका अनुभवी नेतृत्वाचा आहे,” असे सांगितले.
आगामी काळात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी लक्ष्मीताई ताठे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, लक्ष्मीताई ताठे यांच्या पक्षांतरामुळे शिंदे गटाच्या स्थानिक संघटनात्मक रचनेला धक्का बसल्याचे बोलले जात आहे. महिला आघाडीमध्ये त्यांची पकड मजबूत असल्याने याचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसून येऊ शकतो.
एकूणच,लक्ष्मीताई ताठे यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश हा स्थानिक तसेच जिल्हास्तरीय राजकारणात नवे समीकरण तयार करणारा ठरत असून पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे,महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड यांच्यासह बाळासाहेब शिंदे,दीपक पगारे,सोनू शिंदे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
