मेहनती कार्यकर्त्यांना डावलून आयतारामांना संधी..!भाजप नेतृत्वावर सौ.प्राप्ती संदीप चव्हाण यांचा थेट हल्लाबोल प्रभाग ३ मधून विकास आघाडीच्या झेंड्याखाली उमेदवारी अर्ज दाखल
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय जनता पार्टी मंडळ महिला मोर्चाच्या माजी अध्यक्ष सौ.प्राप्ती संदीप चव्हाण यांनी भाजप पक्ष नेतृत्वावर जाहीरपणे आणि अत्यंत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून त्यांनी भाजपच्या अंतर्गत कार्यपद्धतीवर,निर्णय प्रक्रियेवर आणि नेतृत्वाच्या भूमिकेवर घणाघाती टीका केली आहे.सौ.चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “भाजपमध्ये मेहनती,जाणकार आणि रस्त्यावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डोके वर काढण्याची संधीच दिली जात नाही.वर्षानुवर्षे वाट पाहणाऱ्यांचे हित सातत्याने दुर्लक्षित केले जाते,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.पक्षातील निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून अनेक निर्णय हे कार्यकर्त्यांचा विश्वास न घेता घेतले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
“भाजपने आमच्या मेहनतीचा योग्य मोबदला दिला नाही.अनेक वेळा आमचा आवाज मांडण्याचा प्रयत्न केला,मात्र तो ऐकून घेण्यात आला नाही,” असे सांगत त्यांनी पक्ष नेतृत्वाच्या धोरणांवर थेट निशाणा साधला.त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपमधील वाढत्या अंतर्गत असंतोषाचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.दरम्यान,सौ.चव्हाण यांच्या या विधानांनंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या असून,भाजप कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता वाढताना दिसत आहे. मुंबईत उमेदवारी जाहीर करताना संतप्त कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केल्याची उदाहरणे सध्या भाजपमधील नाराजीचे वास्तव अधोरेखित करत आहेत.सौ.प्राप्ती संदीप चव्हाण या केवळ भाषणांपुरत्या मर्यादित नसून त्यांनी प्रभागातील स्वच्छता,गटार,पाणीपुरवठा, रस्ते आणि मूलभूत नागरी सुविधांसाठी वेळोवेळी थेट हस्तक्षेप करत प्रशासनाशी दोन हात केले आहेत. तातडीच्या समस्यांवर तत्काळ उपाययोजना करून त्यांनी अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे.केवळ आश्वासनांवर न थांबता प्रशासनातील त्रुटींविरोधात ‘सिस्टीमशी आरपार लढा’ देण्याची भूमिका त्यांनी सातत्याने घेतली आहे.भाजपशी दीर्घकाळ एकनिष्ठ राहूनही ऐनवेळी पक्षाने त्यांना डावलून नव्याने दाखल झालेल्या उमेदवाराला संधी दिल्यामुळे नाराज न होता, जनतेसाठी अधिक प्रभावीपणे काम करता यावे या उद्देशाने सौ.चव्हाण यांनी मोठा राजकीय निर्णय घेतला आहे.मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राजीनामा दिलेले कन्नडचे पहिले आमदार हर्षवर्धन रायभान जाधव यांच्या विकास महर्षी रायभानजी जाधव विकास आघाडी कन्नड तर्फे त्यांनी प्रभाग क्रमांक ३ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी त्यांनी भाजपमधील उमेदवारी प्रक्रियेतील विसंगतीही उघड केली.“सर्वसाधारण महिला जागेसाठी मला पक्षाचा ‘बी फॉर्म’ मिळाला नाही,मात्र कोणतेही राजकीय काम न केलेल्या,कधी किचनच्या बाहेरही न आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या पत्नीला थेट बी फॉर्म देण्यात आला.सर्वसाधारण पुरुषासाठी असलेल्या जागेवर ओबीसी पुरुष भरला गेला,” असा खळबळजनक आरोप त्यांनी यावेळी केला.शेवटी त्यांनी नागरिकांना आवाहन करत म्हटले की, “येणाऱ्या काळात जनतेने सारासार विचार करून,विकास, प्रामाणिकपणा आणि संघर्षाची बाजू पाहून निर्णय घ्यावा.”सौ.प्राप्ती संदीप चव्हाण यांच्या या ठाम आणि निर्भीड भूमिकेमुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून,प्रभाग क्रमांक ३ मधील निवडणूक लढत आता अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.प्राप्तीताई चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून त्यांच्यावर पराभवाचे सावट आतापासूनच दिसू लागले आहे.
