अति जोखीम वर्तन रोखण्यासाठी संपूर्ण सुरक्षा केंद्राची निर्णायक भूमिका; संगमनेर येथे विविध विभागांची भव्य संवेदीकरण कार्यशाळा
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अति जोखीम वर्तन असणाऱ्या व्यक्तींमध्ये वर्तन बदल घडवून आणण्यासाठी नियमित समुपदेशन व जनजागृती अत्यंत आवश्यक असून, हे महत्त्वपूर्ण कार्य संपूर्ण सुरक्षा केंद्राच्या माध्यमातून प्रभावीपणे सुरू असल्याचे प्रतिपादन उपजिल्हा रुग्णालय संगमनेरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड यांनी केले.दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण सुरक्षा केंद्रांतर्गत स्टेक होल्डर, विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींसाठी हॉटेल पंचवटी, शिवसागर रेस्टॉरंट हॉल, संगमनेर येथे एकदिवसीय संवेदीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. राजकुमार जऱ्हाड (वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय संगमनेर), डॉ. संदीप कचेरिया (वैद्यकीय अधिकारी), डॉ. घोलप (तालुका आरोग्य अधिकारी) तसेच श्री. शिवाजी जाधव (जिल्हा कार्यक्रम अधिकारी) यांच्या हस्ते करण्यात आले.
🔹 युवा वर्गात जनजागृती आवश्यक – डॉ. राजकुमार जऱ्हाड
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. राजकुमार जऱ्हाड म्हणाले की, अति जोखीम वर्तन असणाऱ्या व्यक्तींना सातत्याने समुपदेशन केल्यास त्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणता येतो. संपूर्ण सुरक्षा केंद्राच्या माध्यमातून हे कार्य प्रभावीपणे राबविले जात असून, विशेषतः युवकांमध्ये जनजागृती होत आहे. आरोग्य क्षेत्रातील सर्व संस्था व संबंधित घटकांनी हा विषय सखोलपणे समजून घेऊन अधिक सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
🔹 एचआयव्ही/एड्सबाबत अजूनही जागृती गरजेची – डॉ. संदीप कचेरिया
वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया यांनी सांगितले की, आजच्या काळातही एचआयव्ही/एड्सविषयी समाजात गैरसमज आहेत. अति जोखीम गटांमध्ये नियमित व उत्स्फूर्त सहकार्य आवश्यक आहे. संपूर्ण सुरक्षा केंद्र व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागामार्फत विविध उपक्रम राबवून जनजागृती केली जात आहे. या कार्यशाळेतून मिळणारी माहिती प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात वापरण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
🔹 सेवांचे योग्य संदर्भीकरण आवश्यक – डॉ. घोलप
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घोलप यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, संपूर्ण सुरक्षा केंद्राच्या धर्तीवर आरोग्य सेवा पुरवाव्यात. अति जोखीम गटांमध्ये एचआयव्ही/एड्सबाबत अधिक जनजागृती करणे गरजेचे असून, एचआयव्ही व गुप्तरोग सेवांसाठी रुग्णांचे संपूर्ण सुरक्षा केंद्राकडे योग्य संदर्भीकरण करावे, असे त्यांनी आवाहन केले.
🔹 कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट
कार्यशाळेचा उद्देश प्रास्ताविकातून श्री. शिवाजी जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी स्पष्ट केला. उद्घाटनानंतर सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत विविध विषयांवर तज्ज्ञ वक्त्यांनी सत्रांद्वारे मार्गदर्शन केले.
🔹 कायदे, प्रतिबंध व उपचारावर सखोल मार्गदर्शन
ॲड. श्रीमती एस. के. सस्कर यांनी एचआयव्ही/एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा २०१७, त्याची अंमलबजावणी, भेदभाव झाल्यास तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले.
श्री. शिवाजी जाधव यांनी एचआयव्ही व सिफिलीस संक्रमण निर्मूलन, प्राथमिक प्रतिबंध उपाय, गर्भवती महिलांमधील सिफिलीसचा धोका, NACP-5 अंतर्गत सेवा सुविधा, ART उपचार व उपचारातील सातत्य याविषयी सविस्तर माहिती दिली.श्री. विनय इदे यांनी STI/RTI बाबत सविस्तर माहिती देत गुप्तरोगांचे प्रकार, लक्षणे, उपचार पद्धती व पाठपुरावा यावर पीपीटीद्वारे मार्गदर्शन केले.श्री. सागर फुलारी यांनी संपूर्ण सुरक्षा केंद्राचे कार्य, ध्येय, उद्दिष्टे, सेवा सुविधा, आउटरीच अॅक्टिव्हिटी, पेशंट फ्लो चार्ट, धोरणे व विविध शासकीय विभागांशी असलेला समन्वय स्पष्ट केला.श्रीमती सुचित्रा गायकवाड यांनी एकात्मिक सल्ला व समुपदेशन चाचणी केंद्राच्या कार्यपद्धतीसह समुपदेशकांची भूमिका स्पष्ट केली.श्री. दत्ता म्हस्के यांनी एचआयव्ही तपासणीच्या पद्धती व विंडो पिरियड याविषयी माहिती दिली.
🔹 विविध विभागांचा सक्रिय सहभाग
या कार्यशाळेत संपूर्ण सुरक्षा केंद्रातील स्टेक होल्डर, TI संस्था, विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी, आरोग्य कर्मचारी, समाज कल्याण विभाग, महिला व बाल विकास, कुटुंब नियोजन, क्षयरोग विभाग, तालुका विधी सेवा, विहान प्रकल्प आदींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
🔹 कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुचित्रा गायकवाड यांनी केले.आभार प्रदर्शन श्री. सागर फुलारी यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे श्री. राधाकिसन पाटोळे, श्री. धनंजय भरसट, श्रीमती सुचित्रा गायकवाड, श्री. दत्ता म्हस्के, श्री. रोहन भांबळ आदी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
