श्रद्धा,संविधान आणि विकासाचा संगम..समाज विकास आघाडीचा जयसिंह मंदिर ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करत प्रचाराचा शुभारंभ..!
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची राजकीय रंगत दिवसेंदिवस वाढत असतानाच माजी आमदार हर्षवर्धन रायभानजी जाधव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय समाज विकास आघाडी यांनी शहराच्या राजकारणात वेगळा ठसा उमटवत आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे.प्रभाग क्रमांक ३ मधून समाज विकास आघाडीने पती-पत्नीला थेट निवडणूक रिंगणात उतरवून,तसेच उच्चशिक्षित तरुण डॉक्टरालाही संधी देत निवडणुकीत नवी दिशा दिली आहे.प्रचाराची सुरुवात पराक्रम कॉलनी येथील जयसिंह मंदिरात दर्शन घेऊन,त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन करण्यात आली.

या प्रभागातून
🔹 डॉ. केतन दुथडे,
🔹 सौ. प्राप्ती चव्हाण,
🔹 ॲड. संदीप चव्हाण
हे तिन्ही उमेदवार समाज विकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवत असून, पती-पत्नी ‘रिक्षा’ या निवडणूक चिन्हावर उभे असल्याने प्रभागात ही बाब विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.प्रचाराची सुरुवात ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या स्थळावरून करण्यात आली.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंगपूरा येथील पराक्रम कॉलनीमधील महादेव मंदिरात पूजा केल्याचा ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेता, याच पवित्र मंदिरात नारळ वाढवून समाज विकास आघाडीच्या प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला, अशी माहिती आघाडीच्या वतीने देण्यात आली.
उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधताना प्रभागातील मूलभूत प्रश्न, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, युवकांना रोजगार, महिला सक्षमीकरण तसेच पारदर्शक प्रशासन यांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.विशेष म्हणजे उच्चशिक्षित डॉक्टर, कायदेतज्ज्ञ आणि समाजकारणात सक्रिय पती-पत्नी अशी सक्षम टीम असल्याने प्रभाग क्रमांक ३ मध्ये समाज विकास आघाडीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.निवडणुकीत नागरिकांनी “रिक्षा” या चिन्हासमोरील बटन दाबून समाज विकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
