अपहरण नव्हे तर नियोजित कट..!अनैतिक संबंध व पैशांतून तरुणाचा खून करून प्रेत जाळले.. कुख्यात आरोपीसह साथीदारांच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-राहाता तालुक्यात अपहरण झालेल्या इसमाचा अनैतिक संबंध व आर्थिक व्यवहारातून निर्घृण खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून,या प्रकरणात परिसरात दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार दिपक अंबादास पोकळे याला त्याच्या साथीदारासह स्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगर यांनी अटक केली आहे.प्राप्त माहिती नुसार,दि.10/12/2025 रोजी सचिन कल्याणराव गिधे (रा. हॉलीडे पार्क शेजारी,शिर्डी, ता. राहाता,जि.अहिल्यानगर) हे साई सुनिता हॉटेल,शिर्डी येथे गेले होते. याच दरम्यान फिर्यादी श्रद्धा गिधे हिस आरोपी प्रविण वाघमारे याने फोन करून “सचिन फार माजला आहे, त्याचे हातपाय काढावे लागतील” अशी धमकी दिली. त्यानंतर सचिन गिधे घरी परत न आल्याने दि.15/12/2025 रोजी श्रद्धा गिधे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात गु.र.नं. 454/2025 भा.न्या.सं. 2023 चे कलम 137(2) प्रमाणे आरोपी प्रविण उर्फ पचास वाघमारे व दिपक अंबादास पोकळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याच दिवशी आरोपी प्रविण वाघमारे उर्फ पचास व त्याच्या साथीदारांनी गौतम कैलास निकाळे (वय 25,रा. राहाता, हल्ली रा.कालीकानगर, शिर्डी) याला घरातून साकुरी शिव येथे जाण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवर नेऊन उपासणे बाबा मंदिराच्या पाठीमागे,साकुरी येथे लाथा-बुक्क्या व दगडाने मारहाण करून पाय फ्रॅक्चर केला. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 1027/2025 भा.न्या.सं. 2023 चे विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे.एकाच दिवशी दोन गंभीर गुन्हे घडूनही अपहरित इसमाचा शोध न लागल्याने पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री.सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आरोपी व अपहरित इसमाचा शोध घेण्याचे आदेश दिले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.पथकाने सलग 15 दिवस व्यवसायिक कौशल्याने तपास करत पुणे, नाशिक, खारघर (मुंबई), छ. संभाजीनगर,मालेगाव आदी परिसरांत शोधमोहीम राबवली. दि.06/01/2025 रोजी मेंढवण शिवार,संगमनेर येथील दगडाच्या खाणीत आरोपी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून दिपक अंबादास पोकळे (वय 34,रा.लोहारे,ता.संगमनेर) व गणेश गोरखनाथ दरेकर (वय 21,रा.पिंपळगाव जलाल, ता. येवला, जि. नाशिक) यांना ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीत दिपक पोकळे याने साथीदार प्रविण उर्फ पचास वाघमारे,कृष्णा संतोष वाघमारे व गणेश दरेकर यांच्यासह अनैतिक संबंध व आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून सचिन गिधे याचा खून केल्याची कबुली दिली. खुनानंतर प्रेत टायर व डिझेलच्या सहाय्याने जाळून त्याची विल्हेवाट लावल्याचे उघड झाले.या कारवाईत खुनातील प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली विनानंबर स्कॉर्पिओ गाडी (किंमत ₹15 लाख) व 3 मोबाईल फोन (किंमत ₹72 हजार) असा एकूण ₹15,72,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दिपक पोकळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून शिर्डी, राहाता, लोणी, संगमनेर, कोपरगाव परिसरात त्याची दहशत आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, आर्म ॲक्ट व मोक्का अंतर्गत एकूण 17 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ताब्यातील आरोपींना राहाता पोलीस ठाणे गु.र.नं. 454/2025 अन्वये पुढील तपासासाठी हजर करण्यात आले असून तपास राहाता पोलीस ठाणे करीत आहे. दिपक पोकळे याच्या विरोधात खंडणी अथवा इतर तक्रारी असल्यास नागरिकांनी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे,पोलीस अंमलदार विजय पवार,फुरकान शेख,दीपक घाटकर,राहुल द्वारके,भीमराज खरसे राहुल डोके,सुनील मालनकर,सतीश भवर,प्रशांत राठोड,प्रमोद जाधव,महादेव भांड,भगवान धुळे,महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांनी केली आहे.
