लोकशाहीवर धमकीचा घाव..!उमेदवार वकिलास शिवीगाळ व ऑनलाईन बदनामी..चव्हाण कुटुंबीयांची जिल्हा वकील संघाकडे पाठिंब्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-राहूल प्रेमराज भोसले याच्याकडून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ,निवडणुकी दरम्यान धमकीचे फोन तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात असल्याचा गंभीर आरोप करत ॲड.संदीप उत्तमराव चव्हाण यांनी जिल्हा वकील संघाकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे.ॲड.संदीप चव्हाण, रा.साई निवास,विद्यापीठ गेट, जयसिंगपूरा यांनी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष व सचिव यांच्याकडे सादर केलेल्या अर्जात नमूद केले आहे की,राहूल प्रेमराज भोसले या व्यक्तीकडून त्यांना सातत्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली जात असून, निवडणुकीत धमकीचे फोन येत आहेत.याशिवाय सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.अर्जात पुढे नमूद करण्यात आले आहे की,ॲड.संदीप चव्हाण हे जिल्हा वकील संघाचे आजीवन सदस्य असून,ते व त्यांची पत्नी सौ.प्राप्ती संदीप चव्हाण हे दोघेही प्रभाग क्रमांक ३ जयसिंगपूरा येथून निवडणूक उमेदवार आहेत. निवडणूक उमेदवार असल्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबाला गंभीर धोका निर्माण झाला असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
अर्जदाराने नमूद केले आहे की, आपण जिल्हा वकील संघाचा एक भाग असूनही अशा प्रकारच्या धमक्या मिळत असल्याने मानसिक तणावात आहोत.त्यामुळे जिल्हा वकील संघाने आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहावे,तसेच संबंधित व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून न्याय मिळवून द्यावा,अशी मागणी त्यांनी केली आहे.या तक्रारीमुळे वकील वर्गात खळबळ उडाली असून,जिल्हा वकील संघाकडून या प्रकरणी पुढील भूमिका काय घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
